क्षयामुळे दररोज 18 रुग्णांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

मुंबई - क्षयाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच क्षयासाठी देण्यात येणाऱ्या "डॉट्‌स' या गोळ्यांचा वापर मात्र कमी होत असल्याची धक्कादायक माहिती "आरटीआय'मधून मिळाली आहे. "प्रजा' या संस्थेने मांडलेल्या मुंबईतील आरोग्याविषयीच्या लेखाजोख्यातील याचा उल्लेख "टीबी हारेगा, देश जीतेगा' या मोहिमेबद्दल साशंक करणारा आहे. क्षयामुळे मुंबईत दररोज 18 जणांचा मृत्यू होतो, अशी माहितीही या संस्थेला मिळाली आहे.

2012-2013 या वर्षात 36 हजार 417 रुग्ण आढळले होते. 2016-2017 या वर्षात 50 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. क्षयरुग्णांची संख्या वाढली असली तरी या रुग्णांना देण्यात येणाऱ्या डॉट्‌स ट्रीटमेंटसाठी नोंदणी झालेले रुग्ण 50 टक्के कमी झाले आहेत. 2012मध्ये 36 हजार 417 पैकी 30 हजार 828 रुग्ण डॉट्‌स उपचार घेत आहेत. 2016-2017 मध्ये 15 हजार 767 रुग्णांना डॉट्‌स ट्रीटमेंट देण्यात आल्याचे आरटीआयच्या माहितीतून समजले आहे.

हे उपचार अर्धवट सोडणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे उघड झाले आहे. 2012-2013 मध्ये 9 टक्के रुग्णांनी डॉट्‌सचे उपचार अर्धवट सोडले. 2016-2017 मध्ये 19 टक्के रुग्णांनी उपचार अर्ध्यावर थांबवले. परिणामी, एमडीआर, एक्‍सडीआर क्षयाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आरटीआयच्या माहितीनुसार क्षयाने 18 रुग्णांचा दिवसाला मृत्यू होत असल्याची नोंद करण्यात आली आहे.

आरटीआयअंतर्गत मिळालेली आकडेवारी ही पालिका रुग्णालयातील आहे. क्षयासारख्या मोठ्या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना त्यातील उपचार अर्धवट सोडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढणे धोकादायक आहे. रुग्णाबरोबर वैद्यकीय क्षेत्रासाठीदेखील हे आव्हान मोठे असल्याचे मत "प्रजा'चे प्रकल्प संचालक मिलिंद म्हास्के यांनी व्यक्त केले.

Web Title: mumbai news 18 patients die every day due to tuberculosis