19 मृतदेह दोन वर्षांपासून पडून

19 मृतदेह दोन वर्षांपासून पडून

मुंबई - महापालिकेच्या कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड झाला आहे. येथे दीड वर्षापासून 19 मृतदेह अंत्यविधी न होता पडून आहेत. ओळख पटत नसल्याने पोलिस हतबल झाले आहेत. मृतदेहांचे "डीएनए' करून अंत्यविधी करावा, असे पत्र पालघर आणि मुंबई पोलिसांना पाठवण्यात आले आहे.

उपनगरांतील पालिकेचे कांदिवली शताब्दी रुग्णालय महत्त्वाचे मानले जाते. पश्‍चिम द्रुतगती महामार्ग आणि रेल्वे अपघातांतील आठ ते 10 मृतदेह दररोज शवागारात आणले जातात. दररोज रुग्णालयात तीन ते पाच रुग्णांचा मृत्यू होतो; पण दोन वर्षांपासून रुग्णालयातील शवागारात 19 बेवारस मृतदेह पडून आहेत. विरार, भाईंदर, काशिमिरा, वसई पोलिसांना याचा जणू विसर पडला आहे. सहा मृतदेह अनोळखी असून, ते तिथे कुणी आणले, याची नोंदच नसल्याचे समजते. पालघर ते मिरा रोड पट्ट्यात सरकारी रुग्णालये नाहीत. रस्ते अपघातातील जखमी किंवा रस्त्यांवरील रुग्णांना पोलिस शताब्दी रुग्णालयात आणून सोडतात. नंतर पोलिस फिरकतच नाहीत. उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यावर मृतदेह शवागारात ठेवले जातात. संबंधित पोलिसांना याविषयी कळवले जाते; पण काही कारणांमुळे पोलिस मृतदेह नेण्यास टाळाटाळ करतात.

याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला जातो; पण त्या पत्रांना केराची टोपली दाखवली जाते.

असे 19 मृतदेह नेण्याबाबत संबंधित पोलिसांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मृतांची ओळख पटण्याकरता "डीएनए' चाचणी करण्यात आली. अंत्यविधीबाबत पोलिसांना सूचनाही केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे, जून ते ऑगस्टदरम्यान मोठ्या प्रमाणात बेवारस मृतदेह येतात. सर्वोच्च न्यायालयाने अशा मृतदेहांच्या अंत्यविधीकरता धोरण तयार करण्याचे आदेश केंद्राला दिले आहेत. मुंबईत नोकरीच्या निमित्ताने आलेले, एकटे राहणारे किंवा घर सोडून आलेल्यांची फारशी माहिती पोलिसांना नसते. निवारा नसल्यामुळे ते बसथांबे, रेल्वेस्थानके आणि पदपथांवर राहतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने त्यांना संसर्गजन्य आजाराची लागण होते. पदपथांवर मृतदेह आढळल्यानंतर त्याची स्थानिक पोलिस ठाण्यात नोंद करून मृतदेह शवागारात पाठवला जातो. बेवारसाची ओळख पटवण्यात पोलिसांना अनेक अडचणी येतात. त्यातच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, राजकीय सभा, बंदोबस्त आणि गंभीर गुन्ह्यांच्या तपासामुळे पोलिस अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होते.

शताब्दीतील मृतदेह
पोलिस ठाणे संख्या

कांदिवली 4
भाईंदर 2
वसई 2
विरार 2
काशिमिरा 1
समतानगर 1
एमएमबी 1
अन्य पोलिस ठाणे 6
(ही आकडेवारी रुग्णालयाची आहे.)

* रेल्वे अपघातात चार वर्षांत 224 बेवारस मृतदेह आढळले.
* राज्य गुन्हे अन्वेषण अहवालानुसार 2015 मध्ये मुंबईत 1 हजार 83 बेवारसांची नोंद.
* 2014 मध्ये 4 हजार 800 बेवारस मृतदेहांची पोलिसांनी मरणोत्तर चौकशी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com