23 हजार सोसायट्या, व्यावसायिक संकुलांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न केल्यास वीज-पाणी कापणार

ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न केल्यास वीज-पाणी कापणार
मुंबई - मुंबईतील 20 हजार चौरस मीटरपेक्षा अधिक चटई क्षेत्र असलेल्या सुमारे 23 हजार गृहनिर्माण आणि व्यावसायिक संकुलांनी ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष केल्याने पालिकेने त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांनंतरही दुर्लक्ष करणाऱ्या संकुलांवर नियमानुसार कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या संकुलांचे वीज आणि पाणी कापण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश संबंधित विभाग अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासनाने कामाला सुरुवात केली आहे. ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे आदेश पालिकेने गृहनिर्माण आणि व्यापारी संकुलांना दिले आहेत. त्यापुढील भाग म्हणून मुंबईतील 20 हजार चौरस मीटर आणि त्यापेक्षा अधिक चटई क्षेत्र असलेल्या 23 हजार गृहनिर्माण आणि व्यावसायिक संकुलांवर ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे. पालिकेने तीन महिन्यांपूर्वी तसे आदेश दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीला 1 एप्रिलपासून सुरुवात झाली. जी संकुले ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष करतील, त्यांना नोटिसा देऊन समज देण्यात आली आहे. त्यानंतरही संबंधितांनी आदेश धाब्यावर बसवल्यास अशा संकुलांवर पर्यावरण कायद्यानुसार कारवाईचा निर्णय पालिकेने घेतला आहे. लवकरच सोसायट्या, संकुलांचे वीज व पाणी जोडणी कापण्यासाठी यादी तयार केली जाईल, अशी माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

Web Title: mumbai news 23000 society business complex notice