कामा रुग्णालयात सात कुमारी माता प्रसूत

हर्षदा परब
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

मुंबई - द कामा ऍण्ड आल्‌ब्लेस रुग्णालयात 2017 मध्ये ऑक्‍टोबरपर्यंत सात कुमारी मातांची प्रसूती झाली आहे. गतवर्षीच्या आकडेवारीनुसार रुग्णालयात येणाऱ्या कुमारी मातांचे प्रमाण कमी झाले आहे. आकडा कमी असला तरी हे प्रमाण जास्त असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे.
कामा रुग्णालयात ऑगस्टमध्ये दोन कुमारिकांनी बाळांना जन्म दिला.

मुंबई - द कामा ऍण्ड आल्‌ब्लेस रुग्णालयात 2017 मध्ये ऑक्‍टोबरपर्यंत सात कुमारी मातांची प्रसूती झाली आहे. गतवर्षीच्या आकडेवारीनुसार रुग्णालयात येणाऱ्या कुमारी मातांचे प्रमाण कमी झाले आहे. आकडा कमी असला तरी हे प्रमाण जास्त असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे.
कामा रुग्णालयात ऑगस्टमध्ये दोन कुमारिकांनी बाळांना जन्म दिला.

मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही मातांना झालेली बाळे मानसिकदृष्ट्या विकलांग आहेत. त्यातील एक माता भिवंडी येथील असून ती स्वतः मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचे कळते. या दोन्ही बाळांचा ताबा कायदेशीर कारवाईनंतर संस्थांकडे देण्यात आल्याचे रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले.

2009 ते 2013 या पाच वर्षांत 51 कुमारी मातांची रुग्णालयात प्रसूती करण्यात आली होती. यंदाची आकडेवारी ऑक्‍टोबरपर्यंतची असल्याने ती कमी दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. या माता सरकारी रुग्णालयात आल्याने त्यांची नोंद झाली आणि त्यांच्या बाळांसाठी कायदेशीर पर्याय खुले झाले. कुटुंबाचे समुपदेशनही झाले; मात्र खासगी रुग्णालयांत, दवाखान्यांत किंवा अन्य ठिकाणी गर्भपातासाठी जाणाऱ्या मातांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही. अशाच एका प्रकरणात खासगी रुग्णालयात बाळाच्या जन्माच्या वेळी मातेचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

कुमारी मातांमध्ये 18 ते 26 वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात सुशिक्षित आणि अशिक्षित महिलांचा समावेश असतो; पण कमी शिकलेल्या महिलांचे प्रमाण अधिक असते. यासंदर्भात डॉ. कटके यांनी काही वर्षांपूर्वी एक अहवाल प्रसिद्ध केला होता.

पाचव्या-सहाव्या महिन्यात पोट दिसू लागल्यानंतर या माता येतात. अनेकदा त्या एकट्याच रुग्णालयात येतात. कधी मुलीची आई घरातील कुणालाही न सांगता गर्भपातासाठी मुलीला रुग्णालयात आणते. एकट्या आलेल्या मातांना तसेच मातेला घेऊन आलेल्या नातेवाइकांपैकी जवळच्या नातेवाइकाचे समुपदेशन केले जाते. लादलेल्या गरोदरपणामुळे मानसिक ताणाखाली असलेल्या मातेला आधार मिळावा यासाठी या काही प्रक्रिया कामा रुग्णालयात काटेकोरपणे केल्या जातात, असे डॉ. कटके यांनी सांगितले.

कामा रुग्णालयात येणाऱ्या कुमारी मातांना प्रसूती होईपर्यंत रुग्णालयात ठेवून त्यांची सुरक्षित प्रसूती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. अनेकदा पोट दिसू लागल्यामुळे या मातांना समाजात त्रास होऊ नये म्हणून कुटुंबीयच तशी मागणी करतात. यापैकी अनेक माता नैसर्गिक प्रसूतीवर भर देतात. त्यांना लग्न करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी ही मागणी असते. अशा मातांबरोबर त्यांचे जोडीदार क्वचितच येतात. काही वर्षांपूर्वी आलेल्या मातांपैकी तीन मातांचे समुपदेशन करून लग्न लावण्यात रुग्णालयाला यश आले होते, असे डॉ. कटके यांनी सांगितले. त्यातील काहींनी लग्नानंतर त्यांच्या बाळाचाही स्वीकार केला.

आधार कार्ड देणे सक्तीचे
रुग्णालयात येणाऱ्या या माता गर्भधारणेचे कारण नोंदवतात. ही गर्भधारणा जबरदस्तीमुळे किंवा मुलीच्या परवानगीने झाली का, हे तपासणे अत्यंत आवश्‍यक असते. मुलगी अल्पवयीन असेल आणि तिच्यावर जबरदस्ती झाली असेल तर "पॉस्को'अंतर्गत गुन्हा नोंदवला जातो. या प्रक्रियेत पोलिसांना सहभागी करून घेतले जाते. मुलीने तिच्या गरोदरपणाचे रुग्णालयाला दिलेले कारण आणि पोलिसांना दिलेले कारण याची पोलिसांकडून लेखी नोंद घेतली जाते. मुलीच्या जवळच्या नातेवाइकाच्या ओळखपत्रांबरोबर आता आधार कार्ड देणेही सक्तीचे करण्यात आल्याचे रुग्णालयातील समाजसेवक राजरतन गायकवाड यांनी सांगितले.

वय समजण्यासाठी दातांची तपासणी
मुलीने सांगितलेले वय आणि तिची शारीरिक प्रकृती यात तफावत असेल तर मुलीच्या दातांच्या तपासणीतून तिचे नेमके वय जाणून घेतले जाते.

कामा रुग्णालयात आलेल्या कुमारी माता
वर्ष कुमारी माता

2017 - 7 (ऑक्‍टोबरपर्यंत)
2016 - 5
2015 - 6
2014 - 11
2013 - 15

- 98 टक्के माता प्रसूतीनंतर बाळ सोडून देण्याचा निर्णय घेतात.
- 1 ते 2 टक्के माता प्रसूतीनंतर बाळ सोबत नेतात.
- संस्थांकडे दत्तक देण्यासाठी दिलेल्या मुलाचा ताबा घेण्यासाठी कुटुंब आणि आईला तीन महिन्यांचा कालावधी.

Web Title: mumbai news 7 unmarried girl delivery