फेरीवाल्यांसाठी 89 हजार जागा निश्‍चित करण्यासाठी प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

मुंबई - फेरीवाल्यांसाठी पालिकेने 89 हजार 797 जागा निश्‍चित केल्या आहेत. त्या अंतिम करण्यासाठी पालिकेने नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागांबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई - फेरीवाल्यांसाठी पालिकेने 89 हजार 797 जागा निश्‍चित केल्या आहेत. त्या अंतिम करण्यासाठी पालिकेने नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागांबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पालिकेने फेरीवाल्यांसाठी यापूर्वी 22 हजार 97 इतक्‍या जागा निश्‍चित केल्या होत्या. मात्र, फेरीवाल्यांची संख्या वाढत गेल्याने आता 89 हजार 797 जागा ठरवण्यात आल्या आहेत. त्यांची यादी पोर्टलवर टाकण्यात आली असून ती अंतिम करण्यासाठी हरकती-सूचना मागवल्या आहेत. हरकती-सूचनांच्या छाननीनंतरच त्या जागा निश्‍चित केल्या जातील. सध्या त्याची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत मुंबई महापालिकेकडे 99 हजार 435 अर्ज आले आहेत. त्या अर्जदारांची पात्रता-अपात्रता निश्‍चित केली जाणार आहे. त्यासाठी टाऊन वेंडिंग कमिटी स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 20 पैकी 12 जणांच्या कमिटीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. फेरीवाल्यांची पात्र-अपात्रता निश्‍चित झाल्यावर त्यांच्यातून आठ सदस्य नियुक्त केले जातील. रेल्वेस्थानक आणि मंडयांपासून दीडशे मीटरच्या आत आणि रुग्णालये, शाळा वा मंदिरांपासून 100 मीटर परिसरात फेरीवाल्यांनी बसू नये, असा नियम आहे. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. अनेक वर्षांपासून फेरीवाला धोरण राबवले गेले नसल्याने त्यांच्यावर कारवाई करू नये. टाऊन वेंडिंग कमिटीची स्थापना करून फेरीवाल्यांची पात्र-अपात्रता निश्‍चित करावी आणि हॉकिंग-नॉन हॉकिंग झोन तयार करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यापूर्वी 20 जणांची टाऊन वेंडिंग कमिटी नियुक्त करण्यासाठी जाहिरात देऊन अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार अनेकांनी अर्ज केले. अर्जदारांची पात्र-अपात्रता निश्‍चित करण्यात आली.

पात्र-अपात्रतेनंतरच जागा ठरणार
पाच सरकारी अधिकारी आणि संस्था- मंडळे यांचे सात सदस्य अशा 12 जणांची समिती नियुक्त करण्यात आली असून राज्य सरकारने त्याला मंजुरी दिली आहे. त्यातून आठ जणांना नियुक्त करणे आवश्‍यक आहे. मात्र फेरीवाल्यांच्या पात्र-अपात्रतेनंतरच त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. आता फेरीवाल्यांसाठी जागा निश्‍चित करण्यासाठी हरकती-सूचनांची प्रक्रिया सुरू झाली असून ती संपल्यावर जागा निश्‍चित केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: mumbai news 89000 place final process for hawkers