'आधार'चा सर्व्हर कासवगतीने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

मुंबई - 'आधार' नोंदणीच्या प्रक्रियेदरम्यान मंदावलेल्या सर्व्हरची तक्रार करणारी पत्रे पोस्ट खात्याने "यूआयडी'ला लिहिली आहेत. राज्यात आधार नोंदणीदरम्यान मंदावलेले काम पाहता ग्राहकांचा रोष सहन करावा लागत असल्याची पोस्टाची तक्रार आहे. त्यामुळेच दिवसापोटी अधिकाधिक नागरिकांची आधार नोंदणी करणे शक्‍य व्हावे म्हणून पोस्टाने सर्व्हरच्या कासवगतीचा पाढाच वाचला आहे. सध्याच्या वेगानुसार दिवसापोटी अवघ्या 11 जणांची नोंदी एका केंद्रावर होत आहे. ही संख्या दिवसापोटी 30 पर्यंत पोचावी, अशी पोस्टाची मागणी आहे. आधार कार्डचा डेटा अपडेट करण्याची प्रक्रिया तुलनेत सुरळीत पार पडत आहे; पण नवीन आधार क्रमांक नोंदणी प्रक्रिया मात्र सर्व्हरच्या धिम्या गतीने वेळखाऊ ठरत आहे. अनेकदा सर्व्हर डाउन असल्याने नागरिकांचा बायोमेट्रिक डेटा आधारच्या यंत्रणेत सेव्ह होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांना बायोमेट्रिक डेटासाठी पुन्हा पुन्हा फेऱ्या माराव्या लागल्या आहेत. सर्व्हर धिमा असल्याने नागरिकांनाही रांगेत ताटकळत राहावे लागते. परिणामी, नागरिकांचा रोष पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. अनेक नागरिक सकाळपासूनच पोस्टाच्या कार्यालयात रांगा लावून उभे असतात; पण दिवसापोटी आधार नोंदणीच कमी होत असल्याने अनेकांच्या पदरी निराशा येते.
Web Title: mumbai news aadhar card registration server slow