शिक्षणच देशाला प्रगतिपथावर नेईल - आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

मुंबई - शिक्षणामुळे व्यक्तीची समाजाकडे पाहण्याची संवेदनशील वृत्ती जपली जाते. शिक्षण व्यक्तीला विचारप्रवृत्त आणि सत्कार्यास प्रवृत्त करत असल्याने तेच समाजाला आणि देशाला प्रगतिपथावर नेईल, असे प्रतिपादन शिवसेना युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुलुंड येथे केले. टार्गेट प्रकाशन विविध शैक्षणिक पुस्तके आणि सुलभ अशा "व्हिडिओ लेक्‍चर्स'द्वारे उत्तम कामगिरी करत असून त्यांच्या शैक्षणिक उपक्रमात सहभागी होण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

टार्गेट प्रकाशनाच्या मुलुंड येथील कार्यालयात अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज अशा "डिजिटल रूम'चे उद्‌घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. विविध अभ्यास विषयांच्या व्हीडिओ लेक्‍चर्स सिरिज तयार करणे हा "डिजिटल रूम'च्या निर्मितीचा मुख्य उद्देश आहे. या व्हीडिओ लेक्‍चर्सचा क्‍युआर कोड आणि इंटरनेट लिंक पुस्तकांमध्ये संबंधित पाठाच्या खाली देण्यात येणार आहे. टार्गेट प्रकाशनाचे एम. डी. दिलीप गंगारमानी आणि डॉ. कल्पना गंगारमानी, एक्‍झिक्‍युटिव्ह डायरेक्‍टर तुषार चौधरी यांसह सर्व अधिकारी, कर्मचारी आणि संजय वाडेकर, विजय पवार आदी या वेळी उपस्थित होते.

गेली 11 वर्षे टार्गेट प्रकाशन ही संस्था अध्ययन व अध्यापनाचा स्तर उंचावणारी शैक्षणिक पुस्तके प्रकाशित करत आहे. अल्पावधीतच शैक्षणिक प्रकाशन क्षेत्रात टार्गेट प्रकाशनाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता या संस्थेने डिजिटल माध्यमात प्रवेश केला आहे. एक चित्र हजार शब्दांचे काम करते, हे ओळखून अभ्यासक्रमातील विविध संकल्पना लिखित स्वरूपाऐवजी चित्रात्मक (पिक्‍टोरल) आणि चलचित्रात्मक (व्हीडिओ) स्वरूपात मांडल्यास आकलन होणे अधिक सुलभ होते. शिक्षण सुलभीकरणाचा हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच टार्गेट प्रकाशनाने लिखित स्वरूपाच्या पुस्तकांमध्ये आकलनास सुलभ असे निःशुल्क व्हीडिओ देण्याचा आगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. हे व्हीडिओ विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी निश्‍चितच उपयुक्त ठरतील, असे कार्यक्रमात सांगण्यात आले.

Web Title: mumbai news aaditya thackeray talking