मध्य रेल्वेवरही एसी लोकल?

संतोष मोरे
बुधवार, 27 डिसेंबर 2017

मुंबई - मध्य रेल्वेमार्गावरही लवकरच एसी लोकल चालवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या लोकलच्या मार्गातील "उंची'चा अडथळा दूर करण्यात येऊन गारेगार प्रवासाचा अनुभव मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही घेता येईल, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

मुंबई - मध्य रेल्वेमार्गावरही लवकरच एसी लोकल चालवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या लोकलच्या मार्गातील "उंची'चा अडथळा दूर करण्यात येऊन गारेगार प्रवासाचा अनुभव मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही घेता येईल, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

पश्‍चिम रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल सोमवारी धावली. याव्यतिरिक्त 10 वातानुकूलित लोकल पश्‍चिम रेल्वेच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. तसेच एमयूटीपी-3 प्रकल्पांतर्गतही रेल्वेच्या ताफ्यात 47 वातानुकूलित लोकल दाखल होणार आहेत. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून 2018 पर्यंत त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यातील काही लोकल मध्य रेल्वेवरही चालवण्यात येण्याची शक्‍यता आहे.

पश्‍चिम रेल्वेमार्गावर सुरू झालेली पहिली वातानुकूलित लोकल प्रथम मध्य रेल्वेवर चालवण्यात येणार होती. तिच्या चाचण्याही घेण्यात आल्या. मात्र, या लोकलची उंची जास्त आणि सीएसएमटी ते कुर्लादरम्यान कमी उंचीचे पूल यामुळे मध्य रेल्वेने एसी लोकल चालवण्यास नकार दिला होता. त्यानंतर पहिली वातानुकूलित लोकल चालवण्यास पश्‍चिम रेल्वेने होकार दर्शवला.

मध्य रेल्वेवरही एसी लोकल सुरू करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व कुर्लादरम्यानच्या एसी लोकलच्या मार्गातील अडथळे दूर करण्यात येणार आहेत. लोकलची उंची मध्य रेल्वेच्या फलाटानुसार ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. वातानुकूलित लोकल मध्य रेल्वेवर चालवल्यास त्रासलेल्या प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळेल.

मुंबईत 11 वातानुकूलित लोकल आणण्याचा प्रस्ताव होता आणि त्यातील एक लोकल पश्‍चिम रेल्वेवर सुरू करण्यात आली. उर्वरित 10 लोकल रेल्वेच्या चेन्नई येथील इंटिग्रेटेड फॅक्‍टरीत बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यातील काही लोकल पश्‍चिम आणि मध्य रेल्वेवर चालवण्यात येणार असल्याचे समजते. पश्‍चिम रेल्वेवर सुरू करण्यात आलेल्या एका लोकलच्या बांधणीचा खर्च 54 कोटी रुपये आहे.

Web Title: mumbai news ac local central railway