भररस्त्यात माणुसकीची तडफड... जखमींना मदतीऐवजी लोकांनी गोळा केले मासे !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले चालक आणि दुचाकीस्वार जमलेली गर्दी आपल्याला मदत करील, या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत होते. पण कुणीही त्यांच्याकडे पाहिले नाही.

नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावर नेरूळ येथील उड्डाणपुलावर सोमवारी पहाटे ट्रक, टेम्पो व दुचाकीचा अपघात झाला. रस्त्यावर जखमी टेम्पोचालक, क्‍लीनर आणि इतर जखमी विव्हळत पडले होते. असह्य वेदनांनी तळमळत पडलेल्या या जखमींना रुग्णालयात नेण्याऐवजी बघ्यांची टेम्पोतून पडलेले मासे भराभर उचलून बॅगेत भरण्याची स्पर्धाच सुरू होती. माणसांची संवेदनशीलताच जणू रस्त्यावर मरून पडली होती.

अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहचवणाऱ्यांना पुढे त्रास होऊ नये यासाठी सरकारने कायदा केला आहे, पण इथे या कायद्यानेही शरमेने मान खाली घातली. माणसांचा जीव वाचवण्याऐवजी जिभेचे चोचले पुरवण्यातच जमलेल्या माणसांनी धन्यता मानली. सोमवारी पहाटेच्या सुमारास नेरूळ येथील उड्डाणपुलावर ट्रक, दोन पिकअप टेम्पो व एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भयानक होता की एका टेम्पोचा चालक रस्त्यावर फेकला गेला. ट्रकचा चालक आणि दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. टेम्पोमधील हजारो मासे उड्डाणपुलावर तडफडत होते.

ताजे मासे रस्त्यावर पडले आहेत, ही बातमी वाऱ्याच्या वेगाने आजुबाजूला पसरली. पाहता पाहता मोठी गर्दी जमली, पण ही गर्दी जखमींना मदत करण्याऐवजी विखुरलेले मासे गोळा करू लागली. काही जण पिशवीत मासे भरत होते. जवळपास राहणाऱ्यांच्या हातांत चक्क बादल्या होत्या. या रस्त्यावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली. या वाहनांतून उतरलेल्या लोकांनीही पिशव्या काढल्या. पिशवी भरल्यानंतर अनेकांनी आपल्या पॅण्टच्या खिशांतही मासे कोंबले. रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेले चालक आणि दुचाकीस्वार जमलेली गर्दी आपल्याला मदत करील, या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत होते. पण कुणीही त्यांच्याकडे पाहिले नाही.

मासे उचलणारे काही हात टेम्पोजवळ पडलेल्या मृतदेहापर्यंत पोहचले. त्याच्या आजुबाजूला तडफडणारे मासेही लोकांनी भराभर उचलले. काही पांढरपेशांनी आपले महागडे मोबाईल खिशातून काढून या दृश्‍याचे चित्रीकरण करण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावले. रस्त्यात मरून पडलेली ही माणुसकी पाहून पोलिसही हळहळ व्यक्त करत होते. अखेर रुग्णवाहिका आली. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या रक्ताची थारोळी रस्त्यावर साचली होती. पाहणाऱ्यांची मनेही थिजली होती.

Web Title: mumbai news accident shiv-panvel highway accident victims helpless, passersby grab fishes