रेड कॉर्नरच्या नोटिशीनंतर आरोपीचे भारतात प्रत्यार्पण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मुंबई - रेड कॉर्नर नोटिशीनंतर अटक झालेल्या मोहम्मद सुल्तान कादीर ऊर्फ कॅप्टन (59) या आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) पथकाने शनिवारी सिंगापूरमधून प्रत्यार्पण करून भारतात आणले. ईओडब्ल्यूने एखाद्या आरोपीला प्रत्यार्पण करून भारतात आणल्याची ही पहिलीच घटना आहे.

मुंबई - रेड कॉर्नर नोटिशीनंतर अटक झालेल्या मोहम्मद सुल्तान कादीर ऊर्फ कॅप्टन (59) या आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओडब्ल्यू) पथकाने शनिवारी सिंगापूरमधून प्रत्यार्पण करून भारतात आणले. ईओडब्ल्यूने एखाद्या आरोपीला प्रत्यार्पण करून भारतात आणल्याची ही पहिलीच घटना आहे.

सिंगापूरमध्ये नोकरी लावून देतो असे सांगत 2006 मध्ये 30 बेरोजगारांची फसवणूक केल्याचा कॅप्टनवर आरोप आहे. मुंबईत आणण्यात आल्यानंतर त्याला रविवारी अटक करण्यात आली. दीड महिन्यापासून प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू होती. त्याला सिंगापूरमध्ये अटक झाल्याचे वृत्त "सकाळ'ने सर्वप्रथम (28 जुलै) दिले होते.

सिंगापूरमध्ये स्ट्युवर्ड म्हणून नोकरी लावून देतो असे आश्‍वासन कॅप्टन याने 2003 मध्ये काही तरुणांना दिले होते. त्यावर विश्‍वास ठेवून 30 तरुणांनी कॅप्टनकडे 29 लाख रुपये जमा केले. परदेशात काम करण्यासाठी फायर फायटिंग कोर्स करणे आवश्‍यक असल्याचे सांगत कॅप्टनने 2006 मध्ये या तरुणांना बेंगळूरुमध्ये पाठवले होते. तेथे प्रशिक्षण घेतल्यानंतर हे तरुण कॅप्टनच्या सांगण्यावरून स्वखर्चाने सिंगापूरला गेले होते. तेथे महिनाभर राहूनही हॉटेल किंवा शिपिंग कंपनीत नोकरी न मिळाल्याने त्यांनी कॅप्टनशी संपर्क साधला असता त्याने भारतीय वकिलातीत जाण्यास सांगितले. तेथे गेल्यानंतर या तरुणांच्या व्हिसाची मुदत संपल्याने त्यांची रवानगी भारतात करण्यात आली होती.

भारतात परतल्यानंतर या तरुणांनी कॅप्टनशी संपर्क केला; मात्र तो भेटणे टाळत असे. त्यामुळे फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर या तरुणांनी ईओडब्लूमध्ये तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून 2007 मध्ये कॅप्टनविरोधात "रेड कॉर्नर' नोटीस बजावली होती. त्यानुसार जुलै महिन्यात सिंगापूरमध्ये कॅप्टनला ताब्यात घेण्यात आले. याबाबतची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी इंटरपोलला दिली. तेथील अधिकाऱ्यांनी ही माहिती ईओडब्ल्यूला दिल्यानंतर दीड महिन्यापासून प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू होते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सह पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे व उपायुक्त पराग मणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली ईओडब्ल्यूचे पथक 20 सप्टेंबरला सिंगापूर येथे गेले.

ईओडब्ल्यूचे कक्ष- 4 चे निरीक्षक केवळे व लोटलीकर, खंडणीविरोधी पथकाचे प्रभारी निरीक्षक अजय सावंत व सहायक पोलिस निरीक्षक दिगंबर बिडवे यांच्या पथकाने शनिवारी (ता. 23) कॅप्टनला मुंबईत आणले. या गुन्ह्यात पोलिसांनी कॅप्टनची पत्नी मुनिझा हिलाही यापूर्वी अटक केली आहे.

Web Title: mumbai news accused entry in india after red corner notice