अनिकेत विश्‍वासरावला लाखो रुपयांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

मुंबई शहरात बळीचा बकरा करणारी टोळी सक्रिय आहे. ते लोक तुम्हालाही भेटू शकतात. माझेही फेसबुक अकाऊंट हॅक झाले. जे माझ्या बाबतीत झाले, ते तुमच्या बाबतीत होऊ नये, तुम्ही सतर्क राहा.
- अनिकेत विश्‍वासराव, अभिनेता

मुंबई - अभिनेता अनिकेत विश्‍वासरावला तीन जणांच्या टोळीने लाखो रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फसवणूकप्रकरणी अनिकेतने स्वत:हून फेसबुक लाइव्हवरून ही माहिती दिली. त्या टोळीने मदतीच्या नावाखाली लाखो रुपये उकळून पलायन केले.

सामाजिक संस्था, तर कधी कर्करुग्णाच्या नावाखाली मदत अशी कारणे देऊन तीन जणांची टोळी मुंबईत फसवणूक करत आहे. या टोळीमध्ये एक मुलगी, तरुण व मध्यमवयीन पुरुषाचा समावेश आहे. ही टोळी लोकांना भेटून त्यांना मदतीसाठी विनंती करते. त्यानंतर लाखो रुपयांचा गंडा घालून पलायन करते. याचा अनुभव अनिकेतला आला. शुक्रवारी (ता. 30) अनिकेतने फेसबुक लाइव्हवरून घडल्या प्रकाराची माहिती जगासमोर आणली.

आजकाल लोक एनजीओ, म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या नावाखाली, कर्करोगपीडित रुग्णांच्या मदतीकरिता भेटतात; मात्र त्यांचा नेमका काय हेतू असतो हे कळत नाही आणि आपण त्यात अडकतो. पैशांचे नुकसान होते; पण भावना दुखावल्या जातात. फसवणुकीमुळे माणुसकीवरील विश्‍वास उडतो. मी याला बळी पडलोय, काही लाख रुपयांचा गंडा घातला गेला आहे, असे अनिकेतने सांगितले. फसवणुकीच्या घटनेचा तपास मुंबई पोलिस करत आहेत.

Web Title: mumbai news actor aniket vishwasrao cheating