अभिनेत्री कृत्तिकाची हत्याच; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - अभिनेत्री कृत्तिका चौधरीच्या (वय 27) मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल मंगळवारी (ता. 13) रात्री अंबोली पोलिसांना मिळाला असून, डोक्‍याला इजा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

कृत्तिका ही मूळची हरिद्वारची रहिवासी होती. लहानपणापासून तिला बॉलिवूडचे आकर्षण होते. सहा वर्षांपूर्वी ती कामानिमित्त मुंबईत आली होती. तिने दोन सिनेमांत कामही केले होते. काही दिवसांपासून अंधेरी-पश्‍चिमेच्या चार बंगला येथील भैरवनाथ सोसायटीत ती एकटीच राहत होती. सोमवारी तिच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. तेव्हा कृत्तिकाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. तिच्या डोक्‍याला इजा झाल्यानेच तिचा मृत्यू झाला असावा, असे डॉक्‍टरांनी शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

कृत्तिकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहेत. तांत्रिक माहितीवरून पोलिस तपास करीत आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी शेजारील रहिवासी, तिच्या संपर्कात असलेल्यांची चौकशी केली आहे. कृत्तिकाने लग्नही केले होते. तिच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात असल्याची माहिती अंबोली पोलिसांना मिळाली आहे. कृत्तिकाच्या हत्येची माहिती तिच्या नातेवाइकांना कळवण्यात आली आहे. बुधवारी (ता. 14) तिचे नातेवाईक मुंबईत येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Web Title: mumbai news actress krutika chaudhary murder