"आधार'मुळे झाली बाप-लेकाची पुनर्भेट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

शंकर मुंबईच्या बालगृहात असल्याचे कळताच त्याचे पालक खूश झाले. दोन वर्षे सातत्याने शोध घेऊनही न सापडलेला शंकर मुंबईत असल्याचे कळताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी तत्काळ मुंबईतील बालगृह गाठले आणि शंकरला पाहताच त्यांचे डोळे पाणावले

मानखुर्द - दोन वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या कुटुंबीयांची अखेर आधार कार्डमुळे पुन्हा भेट झाली. बोलता न येणाऱ्या गतिमंद शंकरला भेटल्यावर तेलंगणातून आलेल्या त्याच्या वडिलांच्या भावना अनावर झाल्या. कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर शंकरला त्यांच्या स्वाधीन करण्यात आल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. गुजरात, केरळ व छत्तीसगडमधून आलेल्या अन्य तिघांचीही आधार कार्डाच्या मदतीने ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे. एकूण 14 मुलांची ओळख पटली असून त्यात सहा मूकबधिर आणि आठ गतिमंदांचा समावेश आहे.

गतिमंद असलेला शंकर पोरिदा तेलंगणा राज्यातून दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झाला. तो मुंबईत येऊन पोहोचला. त्याला बोलता येत नसल्यामुळे मुंबई पोलिसांसमोर त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे आव्हान होते. त्याला उमरखाडी-डोंगरीतील चिल्ड्रेन्स एड सोसायटीअंतर्गत असलेल्या बालगृहात ठेवण्यात आले.

शंकरसारखीच आणखी मुले तिथे आहेत. त्यापैकी काही जणांना अन्य बालगृहांमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांचे बुद्‌ध्यांक परीक्षण करताना रुग्णालयातून आधार क्रमांकाविषयी विचारणा करण्यात आली. बालगृहाच्या अधीक्षिका तृप्ती जाधव यांनी जिल्हाधिकारी संपदा मेहता व एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त कमलाकर फड यांच्याशी संपर्क साधून त्यांचे आधार कार्ड बनवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. आधार कार्ड बनवण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावर चौदा मुलांचे आधार कार्ड आधीपासूनच असल्याचे लक्षात आले; मात्र सविस्तर माहिती मिळत नव्हती. अखेर "यूआयडीएआय'च्या अधिकाऱ्यांनी माणुसकीच्या दृष्टीने विशेष बाब म्हणून सहकार्य केत्याने निराधार शंकरला आधार मिळाला. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या कुटुंबीयांचा शोध लागला. शंकर मुंबईच्या बालगृहात असल्याचे कळताच त्याचे पालक खूश झाले. दोन वर्षे सातत्याने शोध घेऊनही न सापडलेला शंकर मुंबईत असल्याचे कळताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी तत्काळ मुंबईतील बालगृह गाठले आणि शंकरला पाहताच त्यांचे डोळे पाणावले.

चौघांना मिळाले नवीन बालगृह
बुद्‌ध्यांक चाचणीनंतर संस्थेतील आधार कार्ड असलेल्या चार मुलांना जालन्यातील स्वर्गीय शंकरलाल मुंदडा वसतिगृहात पाठवण्यात आले आहे. बाल कल्याण समितीच्या आदेशाने त्यांना तिथे पाठवण्यात आल्याची माहिती अधीक्षक तृप्ती जाधव यांनी दिली.

Web Title: mumbai news: adhar card