चोवीस विभागात विकास आराखडा समजावून सांगण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

मुंबई - विकास आराखड्यातील तांत्रिक बाबी नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांना समजाव्यात, त्यातील आरक्षणे कुठे कशी पडली आहेत त्याची माहिती स्थानिकांना तसेच लोकप्रतिनिधींना व्हावी या उद्देशाने आता विकास आराखड्याचे विभागवार सादरीकरण केले जाणार असून पालिकेच्या चोवीस विभागात विकास आराखडा मांडून तो नागरिकांना समजावून सांगण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकतेच विकास
आराखड्याचे सादरीकरण झाले. पालिका मुख्यालयातही या विकास आराखड्याचे सादरीकरण झाले. नगरसेवकांना समजावा यासाठी त्याचे पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितीत सादरीकरण केले. मुंबईच्या विकास आराखड्याला दिलेली दोन महिन्यांची मुदत गेल्या 19 मे रोजी संपली. विकास आराखड्याच्या मंजूरीबाबत शिवसेनेला अडचण वाटत होती. शिवसेनेच्या नगरसेवकांना अजूनही विकास आराखडा कळलेला नाही. त्यामुळे या विकास आराखड्‌याला पुन्हा मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेना करीत होती. अखेर पालिका सभागृहाने विकास आराखड्‌याला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

हा विकास आराखडा आता चोवीस विभाग कार्यालयांमध्ये नगरसेवकांना तसेच स्थानिक नागरिकांना समजावून देण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. विकास आराखड्यात नेमके काय आहे हे समजावून दिले जाईल. त्यादृष्टीने विभागवार अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. वाढवून दिलेली मुदत संपताच विकास आराखडा नगरविकास खात्याकडे पाठवून दिला जाईल अशी माहिती पालिका आयुक्त मेहता यांनी दिली. राज्य सरकारची मंजूरी मिळाल्यास नव्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: mumbai news ajoy mehta order to municipal