अख्खे कुटुंबच बेपत्ता झाल्याने खळबळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

मुंबई - विरार येथून अख्खे कुटुंबच बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शर्मा आडनावाच्या या कुटुंबातील सून बाळंतपणासाठी माहेरी गेली असून, या प्रकाराने ती हादरून गेली आहे.

मुंबई - विरार येथून अख्खे कुटुंबच बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शर्मा आडनावाच्या या कुटुंबातील सून बाळंतपणासाठी माहेरी गेली असून, या प्रकाराने ती हादरून गेली आहे.

पती अरुण शर्मा, सासू अनिता शर्मा, दीर अश्‍विन शर्मा, चुलतसासरे सुरेंद्र शर्मा, त्यांची पत्नी मालिनी व मुलगी प्रियंका अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. तिने अर्नाळा पोलिस ठाण्यात ई-मेलद्वारे तक्रार दिली आहे. विरार- पश्‍चिम येथील ग्लोबल सिटीमध्ये सतीशचंद्र शर्मा पत्नी व दोन मुलांसह राहत होते. त्यांचा मोठा मुलगा वरुण याचा 18 एप्रिल 2016 मध्ये संगीता हिच्याशी विवाह झाला. वरुण व त्याचा भाऊ हे ग्राफिक डिझायनर आहेत. त्यांचे काका सुरेंद्र शर्मा हे "एलआयसी'चे काम करतात. संगीता बाळंतपणासाठी अमरावती येथे माहेरी गेली. 15 जूनला तिला मुलगी झाली. त्यानंतर वरुण ऑक्‍टोबरमध्ये पुन्हा दोघींना भेटण्यासाठी अमरावतीला गेला होता. 14 ऑक्‍टोबरला संगीतासोबत त्याचे बोलणेही झाले. त्यानंतर त्यांचे बोलणे झाले नाही. त्यामुळे संगीताने वरुणचे काका सुरेंद्र शर्मा यांना फोन केला. त्यांनी थोड्या वेळाने फोन करतो, असे सांगितले; मात्र बराच वेळ फोन केलाच नाही. अखेर संगीतानेच संपर्क साधल्यानंतर त्यांचा फोन बंद असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर तिने आपल्या दिराला फोन केला; पण तो काही न बोलताच फोन ठेवत होता. त्यानंतर तिने त्याला व्हॉट्‌सऍपवर मेसेज केला. तो मेसेज त्याने वाचलाही; पण फोन केला नाही, की उत्तर दिले नाही. रात्री साडेदहा वाजेपर्यंत तिचे संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू होते.

दुसऱ्या दिवशी 15 ऑक्‍टोबरला सर्वांचेच फोन बंद झाले. या प्रकाराने घाबरलेल्या संगीताने गुगलवरून विरार पोलिस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक शोधला. त्यावर संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी तिला अर्नाळा पोलिस ठाण्याचा संपर्क क्रमांक दिला. सर्व हकीगत सांगितल्यावर ई-मेलद्वारे तक्रार नोंदवली. त्यानंतर अर्नाळा पोलिस शर्मा यांच्या घरी पोचले असता, सर्वच कुटुंब घरातून बेपत्ता झाल्याचे स्पष्ट झाले.

सुरतमध्ये मोबाईल विकले
संगीता शर्मा हिने दिलेल्या तक्रारीवरून अर्नाळा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या कुटुंबातील सदस्यांनी सुरत येथे आपले मोबाईल विकल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या परिवारासोबत नेमके काय झाले, त्यांच्यावर कुणाचे कर्ज अथवा काही आर्थिक विवंचना आहे का, याबाबत तपास करत आहे, असे अर्नाळा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राकेश पगारे यांनी सांगितले. अचानक बेपत्ता झालेल्या कुटुंबाने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

Web Title: mumbai news all family missing