साथी हाथ बढाना 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

अंबरनाथ - अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणावर सिमेंटच्या रस्त्यांचे काम झाले असताना राहुल इस्टेट परिसरात चालण्यायोग्य रस्ताच नसल्याने स्थानिकांना हमरस्ता गाठता येत नाही. रस्ता बनवण्याकडे नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक महिलांसह इतर नागरिकांनी पुढाकार घेत वर्गणीतून रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

नवरे नगर परिसरात राहुल इस्टेटजवळ आनंद, उपवन आदी आठ ते दहा गृहसंकुले आहेत. येथील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. पावसाळ्यात तर खड्डे आणि पावसाच्या पाण्यातून वाट काढत नागरिकांना चालावे लागते. त्यामुळे लहान मुले आणि नागरिकांना दुखापती झाल्या आहेत. याबाबत नगरपालिका प्रशासन, स्थानिक नगरसेविका व विद्यमान नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही रस्ता तयार झाला नाही. कामावर न जाता सुट्टी घेऊन नाइलाजाने रस्त्याचे काम हाती घेतल्याचे धनलक्ष्मी जयशंकर, प्रिया पवार यांनी सांगितले. 

रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी तर काही नागरिकांनी ५० ते १०० रुपये वर्गणी दिली. जमा झालेल्या १२ हजार ५०० रुपयांतून रस्त्यासाठी लागणारे दगड, माती विकत आणले. 

राहुल इस्टेट परिसरात रस्त्याची दुरवस्था झाल्याने नगरपालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्ता दुरुस्त करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर केली जाईल. 
-प्रज्ञा बनसोडे, नगराध्यक्ष 

खराब रस्त्याची माहिती घेऊन, त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणार आहे.
- मनीष भामरे, शहर अभियंता, अंबरनाथ नगरपालिका 

Web Title: mumbai news ambernath news social