अंधेरी रेल्वेस्थानक अस्वच्छतेचे माहेरघर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

जोगेश्‍वरी - पश्‍चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी अंधेरी रेल्वेस्थानक एक समजले जाते. सध्या हे रेल्वेस्थानक अस्वच्छतेचे माहेरघर बनत चालले आहे. अंधेरी रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक १ वरील वाढत्या घाणीमुळे प्रवाशांना फलाटावरून प्रवास करणे जिकिरीचे बनत चालले आहे. 

जोगेश्‍वरी - पश्‍चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी अंधेरी रेल्वेस्थानक एक समजले जाते. सध्या हे रेल्वेस्थानक अस्वच्छतेचे माहेरघर बनत चालले आहे. अंधेरी रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक १ वरील वाढत्या घाणीमुळे प्रवाशांना फलाटावरून प्रवास करणे जिकिरीचे बनत चालले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा केल्यानंतर मुंबईतील उपनगरीय रेल्वेस्थानकांवर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. त्यानुसार चर्चगेट, वांद्रेप्रमाणे अंधेरी रेल्वेस्थानकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदानाच्या माध्यमातून रेल्वेस्थानक स्वच्छ केले. काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन फलाटावरील भिंतीवर छान चित्रेही रेखाटली. मात्र ती मोहीम केवळ एका दिवसापुरतीच मर्यादित राहिली. अंधेरी रेल्वेस्थानकाच्या परिसरातील पसरलेली दुर्गंधी पाहता स्वच्छ भारत अभियानाचा बोऱ्या वाजल्याचे दिसते. या रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक १ च्या बाजूने कायम गटारातील पाणी तुंबलेले असते; तसेच फलाट क्रमांक १ वरील सार्वजनिक शौचालयाजवळ मोठ्या प्रमाणात घाण पसरलेली आहे. या शौचालयात प्रवाशांकडून मुतारीसाठी एक व शौचासाठी पाच रुपये घेण्यात येतात. तरीही शौचालयात व फलाटावर अस्वच्छता पसरलेली असते. त्यामुळे फलाटावर पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागतो. शौचालयावरील पाण्याच्या टाक्‍या ओव्हरफ्लो झाल्या की त्याचे पाणी फलाट क्र. १ वर येते. त्यामुळे फलाटावर पाणी साचून घाण व दलदल निर्माण होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.  

प्रवाशांची गैरसोय
अंधेरी रेल्वेस्थानकावर कायम प्रवाशांची गर्दी असते. तरीही या रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक १ वरच सार्वजनिक शौचालय आहे. त्यामुळे नाइलाजास्तव प्रवाशांना फलाट क्रमांक १ वर जावे लागते. वृद्ध व महिला प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो.

Web Title: mumbai news andheri railway station