एपीएमसीत वाहतुकीचा बोजवारा

एपीएमसीत वाहतुकीचा बोजवारा

नवी मुंबई - वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि मुंबईवरील भार हलका करण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबईतील वाशी येथे स्थलांतरीत केली; परंतु त्या वेळी समितीच्या घाऊक बाजारात ये-जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येचे आणि वाहनतळाचा विचार करून नियोजन केले नसल्याने आज एपीएमसीत वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. येथे दररोज हजार ते दीड हजार वाहनांची ये-जा होत असते; मात्र पार्किंगची जागा अपुरी पडू लागल्याने वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. 

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईतील वाहनांची संख्या सध्या पाच लाखांच्या घरात आहे. दर वर्षी ती २० हजारांनी वाढत आहे. शहरातून मुंबई-पुणे महामार्ग जातो. त्यामुळे त्यावरून धावणाऱ्या हजारो वाहनांचीही त्यात भर पडते. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशभरातून दररोज हजारो वाहने येतात. तेवढीच वाहने येथून जातात. त्यामुळे या भागात नेहमीच वाहतूक कोंडी होते. येथील पार्किंगची जागा अपुरी पडत असल्याने बाजार समितीच्या परिसरात नेहमीच वाहतूक कोलमडते. शहरात येणाऱ्या वाहनांमध्ये एपीएमसीमध्ये सर्वांत जास्त वाहने दररोज येतात. त्यामुळे हा भाग नेहमी वाहनांनी गजबजलेला असतो. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांची वाहने दुकानांसमोरच उभी असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. बाजार समितीमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या वाहनांसाठी येथे स्वतंत्र वाहनतळाची गरज आहे. 

बाजार समितीच्या आवारात एक वाहनतळ आहे; परंतु तोही अपुरा पडतो. बाजारात कृषी माल घेऊन येणाऱ्या व इतर कारणांसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या फार मोठी आहे. माल घेऊन येणाऱ्या वाहनांना बाजारात थांबण्यासाठी रीतसर परवानगी दिली जाते; मात्र इतर वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे येतात.

मध्यंतरी व्यापाऱ्यांच्या खासगी वाहनांना मार्केटच्या बाजूच्या सर्व्हिस रोडचा पार्किंगसाठी वापर करण्याची परवानगी दिली होती; मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही. या सर्व्हिस रोडवर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. बाजारात आलेल्या गाड्या रिकाम्या करण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे बाजारात वाहनांच्या रांगा लागतात. ही समस्या भाजीपाला आणि फळ बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. इतर बाजारात गाड्या रिकामी होईपर्यंत दुसऱ्या गाड्या थांबवण्यासाठी पुरेशी जागा आहे. त्यामुळे तिथे गोंधळ उडत नसला, तरी नियोजन करणे गरजेचे आहे.

वाहनांचे योग्य पार्किंग करण्यासाठी मल्टिस्टोरेज पार्किंगची गरज आहे. अवजड वाहने सर्वांत खाली त्याच्यावर हलकी वाहने अशा पद्धतीच्या मल्टिस्टोरेज पार्किंगची बाजारात गरज आहे. स्वतंत्र वाहनतळासाठी बाजार समितीच्या वतीने सिडकोबरोबरच पालिका आयुक्त रामास्वामी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. पालिकेने जागा दिली, तर वाहनतळ उभारण्यासाठी ५० टक्के खर्च करण्याची आमची तयारी आहे.
- सतीश सोनी, प्रशासक, बाजार समिती 

बाजार परिसरात वाहन पार्किंगसाठी कुठेही स्वतंत्र जागाच नाही. त्यामुळे येणाऱ्या गाड्या एक तर रस्त्याच्या बाजूला उभ्या केल्या जातात किंवा मधेच. बाजार आहे म्हटल्यावर गाड्या येणारच. त्यामुळे इथे स्वतंत्र वाहनतळाची गरज आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आम्ही नेहमी वाहतूक पोलिस तैनात करतो; मात्र हा त्यावरील उपाय नाही. त्यासाठी स्वतंत्र वाहनतळ आवश्‍यक आहे.
- मच्छिंद्र खाडे, वाहतूक पोलिस निरीक्षक

वाहनतळासाठी जागा नसल्याचे कारण पुढे येत आहे. त्यामुळे वाहन पार्किंगसाठी बाजाराला लागून असलेल्या नाल्यावर पार्किंगची सुविधा पालिकेने उपलब्ध करून द्यावी, असा पर्याय आम्ही सुचवला आहे. पालिका आयुक्तांकडे तशी मागणीही केली आहे. यामुळे वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध होईल आणि उघड्या नाल्याची समस्याही दूर होईल. 
- संजय पानसरे, माजी संचालक 

बाजार समितीमध्ये वाढती वाहन संख्या पाहता इथे भविष्यात उद्रेक होण्याची शक्‍यता आहे. पार्किंगचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. येथे पूर्ण क्षमतेचे वाहनतळ आवश्‍यक आहे. येथील वाहनचालकांसाठी राहण्याची व खाण्याची योग्य दरात व्यवस्था असावी. बाजार समितीत नवीन वाहनतळासाठी जागा नसल्याने मल्टिस्टोरेज पार्किंग करावे. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला; परंतु काहीच फायदा झाला नाही.
- भरत सामंत, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com