"सिद्धिसाई' दुर्घटनाप्रकरणी वास्तुविशारदाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

मुंबई - घाटकोपर येथील "सिद्धिसाई' इमारत दुर्घटनेप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी सोमवारी वास्तुविशारदाला अटक केली. या प्रकरणातील ही तिसरी अटक असून, यापूर्वी सुनील शितप व सुपरवायझर अनिल मंडल यांना अटक झाली होती. 

मुंबई - घाटकोपर येथील "सिद्धिसाई' इमारत दुर्घटनेप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी सोमवारी वास्तुविशारदाला अटक केली. या प्रकरणातील ही तिसरी अटक असून, यापूर्वी सुनील शितप व सुपरवायझर अनिल मंडल यांना अटक झाली होती. 

सिद्धिसाई अपार्टमेंटमधील शितप याच्या मालकीच्या तळमजल्यावरील खोली क्रमांक 1, 2 व 3 मधील भिंती व इमारतीतील आरसीसी पिलर तोडून एकच मोठा हॉल बनवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे ही इमारत पडल्याचे प्राथमिक तपासात निषन्न झाले आहे. हा आराखडा बनवणारा वास्तुविशारद रंजित आगळे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. शितपच्या तळमजल्यावरील खोल्यांमध्ये सुरू असलेल्या बांधकामाचा आराखडा रंजितने तयार केल्याचा आरोप आहे. पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती उपायुक्त (परिमंडळ-7) सचिन पाटील यांनी दिली. इमारतीची नेमकी संरचना कशी होती, याबाबत पोलिस पडताळणी करत आहेत. त्यासाठी इमारतीचा नकाशा, डिझाईन व ब्ल्यू प्रिंट याच्या आधारावर तपास सुरू आहे. या दुर्घटनेतून वाचलेले लालचंद जेसाराम रामचंदानी (वय 67) यांच्या तक्रारीवरून पार्कसाईट पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर शितप याला चौकशीसाठी पार्कसाईट पोलिसांनी बोलावून तो दोषी असल्याचे निश्‍चित झाल्यानंतर त्याला अटकही केली. सुपरवायझर मंडल यालाही नंतर अटक झाली होती. तेव्हापासून पोलिस रंजितचा शोध घेत होते. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: mumbai news Architect arrested