साहित्य "सिंहासन' हरपले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मुंबई - प्रतिभावान पत्रकार, कादंबरीकार, नाटककार, कवी, अनुवादक असे बहुपेडी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या अरुण साधू (वय 76) यांचे सोमवारी पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. शीव येथील टिळक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, सुवर्णा-शेफाली या मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांचे देहदान करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता आणि साहित्यातील "साधुत्व' हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

साधू अनेक दिवसांपासून आजारी होते. गणेशोत्सवादरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे घरी पाठवण्यात आले. रविवारी (ता. 24) त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यामुळे त्यांना टिळक रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. साधू यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सोमवारी सकाळी वांद्रे येथील "साहित्य सहवास'मधील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. पत्रकारिता, राजकीय तसेच साहित्य क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी साधू यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
साधू यांचा जन्म 1942 मध्ये अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे झाला. साधू म्हणजे "साधी राहणी, उच्च विचारसरणी' या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण होते. संवेदनशील मन, समाजवास्तवाशी जोडलेली नाळ आणि अत्यंत प्रभावी लेखणी यामुळे ते अल्पकाळातच संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. नागपूरमध्ये झालेल्या 80 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. अत्यंत अभ्यासू असूनही प्रसिद्धिपराङ्‌मुख, संकोची स्वभावाचे असल्यामुळे साधू स्वतःविषयी, आपल्या यशाविषयी कधीच बोलत नसत.

अचूक वेध घेणारे व्यक्तिमत्त्व
साधू यांनी सुरवातीच्या काळात केसरी, इंडियन एक्‍स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, दी स्टेट्‌समन या दैनिकांत काम केले. "फ्री प्रेस जर्नल'च्या संपादकपदाची धुराही सांभाळली. 30 हून अधिक वर्षे पत्रकारिता करतानाच त्यांनी अनेक सामाजिक प्रश्‍नही हाताळले. पुणे विद्यापीठात त्यांनी वृत्तपत्र विभागाच्या विभागप्रमुखाचीही जबाबदारीही सांभाळली. मुंबईतील नागरिकांच्या जगण्याची धडपड-ओढाताण त्यांच्या पहिल्या "मुंबई दिनांक' या कादंबरीपासून दिसून येते. त्यांच्या "सिंहासन' या कादंबरीवर चित्रपट आल्यानंतर ते घराघरांत पोचले. राजकीय कादंबरीला त्यांनी एक नवे परिमाण मिळवून दिले. जब्बार पटेल यांच्यासोबत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्यावरील चित्रपटांचे लेखन केले. त्यांच्या लेखणीतील प्रगल्भता "शोधयात्रा', "मुखवटा' या कादंबऱ्यांतून अधिक ठळकपणे अधोरेखित होते.

Web Title: mumbai news arun sadhu death