ऐरोली नाट्यगृहाच्या जागेवर तळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

नवी मुंबई - ऐरोली सेक्‍टर ५ मधील नाट्यगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन होऊन पाच वर्षे झाली, तरी तेथे केवळ खड्डा खोदण्यापलीकडे काहीच काम झालेले नाही. आता या खड्ड्यात पाणी साचून तळे निर्माण झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा वेगळाच त्रास सहन करावा लागत आहे. येथे साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढली असल्याने त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. 

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ऐरोलीत नाट्यगृह बांधण्याचे काम २०१४ मध्ये सुरू करण्यात आले. सुरुवातीला अडीच कोटींचे हे काम महावीर कन्स्ट्रक्‍शनला देण्यात आले होते. भूमिपूजनानंतर २० टक्के काम झाले होते. त्यात हा मोठा खड्डा खणला. त्यासाठी अडीच कोटी खर्च झाले. त्यानंतर हे काम थांबले ते आजपर्यंत सुरूच झाले नाही. तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून आल्यानंतर त्यांनी हा विषय समजून घेत कंत्राटदाराला काम सुरू करण्यास सांगितले; मात्र त्याने ते सुरू न केल्याने त्यांनी या नाट्यगृहाच्या बांधकामासाठी फेरनिविदा काढण्यास सांगितले. 

या नाट्यगृहासाठी पालिकेने अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद केली होती. त्यानंतर हे काम १५ कोटींवर आले. निधीची तरतूद होत असली, तरी काम मात्र ठप्पच होते. या वर्षीच्या अर्थसंकल्पात या नाट्यगृहासाठी २५ कोटींची तरतूद केली आहे. मात्र त्यानंतरही त्याचे काम सुरू झालेले नाही. आता नाट्यगृहाच्या जागी पाणी साचून तळे तयार झाले आहे. त्यात डासांची उत्पत्ती होत आहे. हिवाळा सुरू झाल्याने डासांचा त्रास वाढत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

नाट्यगृहाचे काम कंत्राटदाराच्या आर्थिक अडचणींमुळे रखडले आहे. त्यामुळे आता नवे कंत्राटदार नेमण्याविषयी महापालिका प्रशासन विचार करत आहे. 
- अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त

नाट्यगृहाच्या बांधकामाला सुरुवात होत नसल्याने नवी मुंबईतील नाट्यकर्मी आणि नाट्य रसिकांमध्ये एकीकडे नाराजी आहे; तर दुसरीकडे डासांच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ही समस्या लवकर सोडवण्याची गरज आहे.
- अमर साळवी, रहिवासी

Web Title: mumbai news Aryoli Natyagraha