अरुंद रेल्वे पादचारी पुलांचे ऑडिट करणार - रेल्वेमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

मुंबई - मुंबईतील अरुंद रेल्वे पादचारी पुलांचे सुरक्षा आणि क्षमता ऑडिट केले जाईल. आवश्‍यकता वाटल्यास अरुंद पूल रुंद केले जातील, अशी प्रतिक्रिया रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर व्यक्त केली. मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत या दुर्घटनेची चौकशी केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

देशातील रेल्वे यंत्रणेच्या सुरक्षेला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्याचबरोबर सोईसुविधा आणि सुरक्षितता या बाबींनाही प्राधान्य दिले जाईल. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आपण मुंबईत उपनगरी रेल्वेने आठ वर्षे प्रवास केला होता. उपनगरी रेल्वे प्रवाशांच्या सोई वाढवून त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वे कटिबद्ध आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

कार्यक्रम रद्द
पियूष गोयल यांचे मुंबईत आज पश्‍चिम व मध्य रेल्वेवर दोन कार्यक्रम होते. तेथे ते रिमोट कंट्रोलने प्रवासी सेवांचे, नव्या रेल्वेमार्गांचे आणि काही सोईसुविधांचे उद्‌घाटन करणार होते; मात्र अपघाताचे वृत्त येताच त्यांनी हे सर्व कार्यक्रम रद्द केले.

प्रवाशांचा संताप
दुर्घटनेमुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी आणि नागरिकांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. मुंबईकर बुलेट ट्रेनचाही निषेध करीत होते. बुलेट ट्रेनऐवजी प्रवाशांच्या सुरक्षेला आणि सोईसुविधांना प्राधान्य द्या, अशी प्रतिक्रिया अनेक रेल्वेस्थानकांवर, रुग्णालयांमध्ये आणि समाजमाध्यमांवरील चर्चेत नागरिक व्यक्त करीत होते.

Web Title: mumbai news Audit of narrow railway pedestrian bridges