एसआरए गैरव्यवहारप्रकरणी बाबा सिद्दिकींची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

तब्बल 400 कोटींचा गैरव्यवहार असल्याचा संशय
मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील 400 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज कॉंग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची चौकशी केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

तब्बल 400 कोटींचा गैरव्यवहार असल्याचा संशय
मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील 400 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज कॉंग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची चौकशी केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील (एसआरए) कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडीने सिद्दिकी यांच्या जबाब नोंदवण्यात आल्याचे आणि त्यांची चौकशीही करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सिद्दिकी यांच्यासह अन्य काहींच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने नुकतेच छापे टाकले होते. या वेळी एसआरए प्रकल्पातील कथित गैरव्यवहार प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी ईडीने सिद्दिकी यांना समन्स पाठवून चौकशीकरिता बोलावले होते. त्यानुसार ते आज सकाळी 11 वाजता ईडीच्या बेलार्ड पिअर कार्यालयात आले होते. त्यांची चौकशी करून त्यांना रात्री साडेआठ वाजता सोडण्यात आले. जवळपास साडेआठ तास त्यांची चौकशी करण्यात आली. या वेळी छाप्यांत जप्त केलेल्या कागदपत्रांची पडताळणीही ईडीने केल्याचे आणि सिद्दिकी यांच्या मालमत्तेची आणि गुंतवणुकीबाबतची माहितीही ईडीने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

गैरव्यवहार 400 कोटींचा
वांद्रे येथील एसआरए प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याची तक्रार स्थानिक स्वयंसेवीने 2012 मध्ये केली होती. जमात ए जमुरीया झोपडपट्टीच्या पुनर्वसन प्रकल्पात एकापेक्षा जास्त घरे मिळवण्यासाठी पुरावा म्हणून बनावट शिधावाटप पत्रिका सादर करण्यात आल्याचा आरोप या स्वयंसेवी संस्थेने केला होता. हा गैरव्यवहार 400 कोटींचा असल्याचा संस्थेचा आरोप होता. याप्रकरणी 2014 मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार ईडीने बाबा सिद्दिकी, रफीक मकबुल कुरेशी, नजमुद्दीन मिठीबोरवाला यांच्यासह तीन कंपन्यांविरोधात एन्फोर्समेंट केस इन्फोर्मेशन रिपोर्ट (गुन्हा) दाखल करण्यात आला होता.

Web Title: mumbai news baba siddhiki inquiry in sra scam