चौदा तास बत्ती गुल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

बदलापूर -  बदलापुरातील कात्रप भागात महावितरणच्या वीजवाहक तारांवर आंब्याचे झाड पडल्याने शनिवारी कात्रप डीपी रोड भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री दोनच्या सुमारास खंडित झालेला हा वीजपुरवठा पूर्ववत होण्यास रविवारी दुपारचे ४.३० वाजल्याने या भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. 

बदलापूर -  बदलापुरातील कात्रप भागात महावितरणच्या वीजवाहक तारांवर आंब्याचे झाड पडल्याने शनिवारी कात्रप डीपी रोड भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री दोनच्या सुमारास खंडित झालेला हा वीजपुरवठा पूर्ववत होण्यास रविवारी दुपारचे ४.३० वाजल्याने या भागातील नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. 

बदलापूर पूर्वेकडील कात्रप भागात जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे रात्री दोनच्या सुमारास महावितरणच्या वीजवाहक तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने कात्रप डीपी रोड भागातील वीजपुरवठा खंडित झाला. हा वीजपुरवठा पूर्ववत होण्यास रविवारी दुपारचे साडेचार वाजले. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, एकदंत बिल्डिंगच्या मागे आंब्याचे एक झाड मुळासकट निघून महावितरणच्या वीजवाहक तारांवर पडल्याने हा वीजपुरवठा खंडित झाल्याचे त्यांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या मदतीशिवाय हे झाड दूर करणे शक्‍य नव्हते. त्यांना कळवण्याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

सकाळी १०.१५ ला माजी नगरसेवक ज्ञानेश्‍नर घोरपडे यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे लीडिंग फायरमन प्रदीप जाधव, शंकर फुलवरे, रवींद्र जाधव, दिलीप ढोके, विजय ढोक आदींनी घटनास्थळी जाऊन महवितरणच्या वीजवाहक तारांवर पडलेल्या झाडांच्या फांद्या शिडी, कटर आदींच्या साह्याने बाजूला करून महावितरणच्या वीजवाहक तारा मोकळ्या केल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कार्यालयाने दिली. चौदा तास नागरिकांना विजेविना राहावे लागल्याने त्यांची गैरसोय झाली.

दोन दिवसांत तीन झाडे पडली
बदलापुरात शनिवारी आणि रविवारी जोरदार पावसामुळे तीन ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. रविवारी बदलापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी एकदन्त बिल्डिंगमागे महावितरणच्या वीजवाहक तारांवर पडलेले आंब्याचे झाड व कात्रप शाळेजवळ पडलेले गुलमोहराचे झाड बाजूला केले; तर शुक्रवारी भागीरथी बिल्डिंगजवळ पडलेले चिंचेचे झाड बाजूला करून रस्ता मोकळा केला. आदर्श शाळेजवळ धोकादायक झाडेही तोडण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

Web Title: mumbai news badlapur electricity