राख्यांच्या बाजारातही बाहुबलीच सरस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

तुर्भे - रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्याची वीण घट्ट करणारा उत्सव. या उत्सवाला अजून दोन आठवडे असले तरी नवी मुंबईतील बाजारपेठा रंगीबेरंगी आणि आकर्षक राख्यांनी सजल्या आहेत. विशेष म्हणजे या वर्षी डोरेमॉन, छोटा भीमबरोबर बाहुबलीच्या चित्रांच्याच राख्यांची संख्या अधिक आहे. चिनी बनावटीच्या राख्यांपेक्षा देशी बनावटीला अधिक पसंती असल्याचेही दुकानदारांनी सांगितले.

बच्चेकंपनीसाठी रक्षाबंधन उत्सवाचे वेगळे महत्त्व आहे. कारण त्यांना या दिवशी छानछान आणि रंगीबेरंगी राख्या मिळतात. या वर्षी राख्यानिर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांनी डोरेमॉन, छोटा भीम यांच्या छबीला राख्यांवर प्राधान्य दिले आहे. दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या बाहुबलीच्या दुसऱ्या भागाचाही राख्यांवर प्रभाव दिसत आहे. मुलांची पसंती ओळखून त्यांनी बाहुबलीची छबी दिली आहे.

एका व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार दोरी, फॅन्सी, स्टोन, मेटल आदी सुमारे २५० प्रकारच्या राख्या नवी मुंबईतील बाजारात दाखल झाल्या आहेत. वाशी येथील सेक्‍टर नऊ, एपीएमसी मार्केटसह अन्य ठिकाणी राख्यांचे तात्पुरते स्टॉल सुरू झाले आहेत. काही दुकानांत चिनी बनावटीच्या राख्याही आहेत; मात्र देशी राख्यांनाच अधिक मागणी आहे.

काही सामाजिक संस्थांनीही राख्या तयार केल्या आहेत. तेही घरोघरी किंवा स्टॉल लावून राख्यांची विक्री करत आहेत. पर्यावरणस्नेही राख्यांकडेही नवी मुंबईकरांचा अधिक कल दिसतो. त्यासाठी खास चंदनाच्या राख्याही बाजारात आहेत, तर श्रीमंत बहिणीसाठी सराफांनी चांदीच्या किंवा सोन्याचा मुलामा दिलेल्या राख्या तयार केल्या आहेत. 

दहा टक्के किमती वाढल्या
गेल्या वर्षीपेक्षा १० ते १२ टक्‍क्‍यांनी राख्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यात जीएसटीचा फटकाही बसण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी ५० रुपयांना मिळणारी राखी यंदा ६० ते ६५ रुपयांना मिळत आहे, तर ९० ते १०० रुपयांना मिळणारी राखी १२० ते १४० रुपयांपर्यंत विकण्यात येत आहे.

Web Title: mumbai news bahubali Raksha Bandhan