बेलापूरमध्ये वीज कडाडली

बेलापूरमध्ये वीज कडाडली

नवी मुंबई - विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या परतीच्या पावसात शनिवारी (ता. ७) सायंकाळी बेलापूर सेक्‍टर २० मध्ये इमारत आणि विजेचा खांब यांच्या मधे वीज पडली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या घरातील सुमारे ४०० वीज उपकरणांचे नुकसान झाले. या घटनेमुळे काही वेळ येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. तो पुन्हा सुरू झाल्यानंतर घरातील सुरू असलेली उपकरणे बंद पडल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले.

गुरुवापासून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे वातावारणात अचानक बदल झाला आहे. ५ ते १५ ऑक्‍टोबरदरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह परतीचा पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानुसार ६ तारखेपासून नवी मुंबईत दुपारनंतर आकाशात ढग दाटून येण्यास सुरुवात झाली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन रोज सायंकाळी पाऊस पडत आहे. शनिवारी सायंकाळी अशाच प्रकारे दुपारनंतर ढग दाटून आले व विजांचा कडकडाट सुरू झाला. पावसाचे प्रमाण कमी असले तरी सोसाट्याच्या वाऱ्यासह आकाशात कडाडणाऱ्या विजांचा लख्ख प्रकाश दिसत होता. त्यात सायंकाळी ७ ते ८ च्या सुमारास बेलापूर सेक्‍टर २० मध्ये नेरूळ-जेएनपीटी महामार्गाच्या शेजारच्या सर्व्हिस रोडजवळच्या इमारतींवर वीज कोसळली. तिचा आवाज इतका प्रचंड होता की तो सुमारे तीन किलोमीटरपर्यंतच्या नागरिकांना ऐकू आला. बेलापूर गावाच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या इमारत व विजेच्या खांबावर वीज कोसळल्यामुळे तेथे ठिणग्या उडाल्या. त्यामुळे घाबरलेले नागरिक जीव वाचवण्यासाठी धावत होते. 

वीज पडल्यानंतर झालेल्या आवाजामुळे मी घाबरून दुकानातून बाहेर रस्त्यावर आले, असे रवी सोलंकी या गॅरेजमालकाने सांगितले, तर रस्त्यावर रिक्षा दुरुस्त करत असलेल्या मॅकेनिकलने उड्या मारल्यामुळे ते वाचले, असे त्यांनी सांगितले. 

वीज पडल्यामुळे गॅरेजमधील ट्युब लाईट व पंखा बंद पडल्याचे त्यांनी सांगितले. वीज पडली तेव्हा तिच्या आवाजाने कानठळ्या बसल्याने कान सुन्न झाले होते. विजेच्या पडलेल्या लख्ख प्रकाशाने डोळे दिपले, असे येथील एका गृहिणीने सांगितले. घरातील सेटटॉप बॉक्‍स आणि टीव्ही बंद पडला, असे विठ्ठल पाटील यांनी सांगितले. 

आपत्कालीन पथक अनभिज्ञ
बेलापूर गावात ज्या ठिकाणी वीज पडली तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या महापालिका मुख्यालयात बसलेल्या आपत्कालीन पथकाला याची माहितीच मिळाली नाही. पालिकेत एका केबीनमध्ये उभ्या असणाऱ्या अधिकाऱ्याने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने प्रशासनाच्या कानावर ही बाब घातली तेव्हा त्यांना हा प्रकार समजला; परंतु वीज पडून जीवितहानी झाली नसल्याने महापालिकेने त्याची दखल घेतली नाही.

बेलापूरमध्ये वीज पडल्याची घटना आमच्या कानावर आली आहे. यात जर काही नागरिकांच्या विजेच्या उपकरणांचे नुकसान झाले असेल तर त्यांना मदत मिळण्याबाबत काही उपाययोजना करता येईल का, याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात येईल.
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com