नेरूळमधील मंडई पडली ओस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

बेलापूर -  नेरूळ, सेक्‍टर १८ मध्ये महापालिकेने भाजी मंडईसाठी इमारत बांधलेली आहे. या मंडईतील ओटलेवाटपही झाले आहे; परंतु येथील फेरीवाले भाजी मंडईत व्यवसाय न करता पदपथावर बसत असल्याने मंडई ओस आणि पदपथ फेरीवाल्यांनी व्यापलेले, असे चित्र येथे आहे. येथील फेरीवाले या मंडईचा गोदाम म्हणून वापर करत आहेत. यामुळे या परिसरातील पादचाऱ्यांची गैरसोय होत असून वाहतुकीतही अडथळे येत आहेत. विशेष म्हणजे महापालिकाही त्यांच्यावर कारवाई करत नाही. यामुळे त्यांचे फावले आहे.

नेरूळमधील भूखंड क्रमांक १५ वर काही वर्षांपूर्वी ताडपत्री लावून मार्केट सुरू होते. या व्यवसायिकांना हक्काची जागा मिळावी, यासाठी २०१५ मध्ये महापालिकेने तेथे दोन मजल्यांची मार्केटची इमारत बांधली. तिच्या तळमजल्यावर भाजी मंडई आणि पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालय आहे. मंडईमध्ये २४ ओटले आहेत. त्यांचे वाटपही केले आहे. त्यानंतर काही फेरीवाले मंडईत; तर काही पदपथांवर व्यवसाय करत होते. पदपथावरील फेरीवाल्यांमुळे गिऱ्हाईक मंडईत येत नसल्याने मंडईतील फेरीवालेही पदपथावर आले. यामुळे पालिकेने लाखो रुपये खर्च करून बांधलेली मंडई ओस पडली आहे. या मंडईमध्ये सध्या बांगड्यांचा एक व्यावसायिक आहे. इतर मंडईचा गोदाम म्हणून माल ठेवण्यासाठी वापर करत आहेत. 

या सर्व प्रकारामुळे येथील पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यांचे ग्राहक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करत असल्याने वाहतुकीत अडथळे येतात. त्यामुळे पदपथांवरील फेरीवाल्यांवर कारवाई करावी आणि ओटलेवाटप केलेल्या परंतु मंडईत व्यावसाय न करणाऱ्यांचे परवाने रद्द करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

नेरूळ, सेक्‍टर १८ मधील भाजी मंडईचा वापर होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. फेरीवाले पदपथावर व्यवसाय करीत असल्याने भाजी मंडई ओस पडली आहे. पदपथावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सातत्याने कारवाई करण्यात येईल. त्यामुळे हे फेरीवाले आपोआप मंडईमध्ये व्यवसाय करतील.
- दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त

Web Title: mumbai news belapur vegetable market