'बेस्ट' निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मुंबई - "बेस्ट'च्या वरळी आगारातील बस निरीक्षकाने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी घडली. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर "एफआयआर' दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी बेस्ट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी केली. बेस्ट महाव्यवस्थापक व समिती अध्यक्षांनी यात लक्ष घालावे; तसेच संबंधित निरीक्षकास न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

"बेस्ट'च्या वरळी आगारात मंगळवारी सकाळी बस निरीक्षक आडारकर यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आगार व्यवस्थापक, सहायक वाहतूक अधिकारी, आगार अधिकारी आपल्या मर्जीप्रमाणे कामगारांना वागणूक देतात. विनाकारण त्रास देणे, रजा मंजूर न करणे, घरापासून दूरच्या आगारात ड्यूटी लावण्याचा प्रकार मागील कित्येक वर्षांपासून सुरू आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत; परंतु अधिकाऱ्यांच्या मनमानीला आळा घालण्यास बेस्ट प्रशासनाला आणि बेस्ट समिती अध्यक्षांना अद्याप यश आलेले नाही.

Web Title: mumbai news best bus officer suicide