मॅरेथॉनमुळे बेस्टचे 30 लाखांचे नुकसान होणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

मुंबई - रविवारी (ता. 21) होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमुळे बेस्टला 12 बसमार्ग बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे बेस्टचे तब्बल 30 लाखांचे नुकसान होणार असून, ते आयोजकांकडून वसूल करावे, अशी मागणी बेस्ट समितीत सर्वपक्षीय सदस्यांनी केली. भीमा कोरेगाव घटनेनंतर करण्यात आलेल्या "महाराष्ट्र बंद' वेळी बेस्टचे झालेले नुकसानही राज्य सरकारकडून वसूल करावे, अशी मागणीही बेस्ट समितीत करण्यात आली.

मॅरेथॉनदरम्यान सकाळी 5 ते दुपारी 1 पर्यंत काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. मुंबई शहर ते उपनगरातील वांद्रेपर्यंत बेस्टचे काही बसमार्ग वळवण्यात येणार आहेत. अनेक बसमार्ग खंडित केले जाणार आहेत. त्यामुळे बेस्टचे अंदाजे 30 लाखांचे नुकसान होणार आहे. मॅरेथॉन म्हणजे सामाजिक कार्य नसून नफा कमावणारा उपक्रम आहे. त्यामुळे आयोजकांकडून पालिकेने दीड कोटी घ्यावे, असा निर्णय नुकताच उच्च न्यायालयाने दिला होता. पैसे दिल्यानंतरच मॅरेथॉनला परवानगी देण्याचे मान्य करण्यात आले होते. असे असताना बससेवा बंद केल्यामुळे होणारे नुकसान आयोजकांकडून वसूल करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने पत्रव्यवहार करावा, अशी मागणीही सुनील गणाचार्य यांनी केली.

2 आणि 3 जानेवारीला महाराष्ट्र बंददरम्यान 263 बसगाड्यांच्या 1 हजार 236 काचा फुटल्या. त्यात बेस्टचे तब्बल 20 लाख 51 हजारांचे नुकसान झाले. बेस्ट बसच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे दोन दिवसांत दोन कोटींचे नुकसान झाले असून, त्याची भरपाई राज्य सरकारकडून मागावी, अशी मागणीही गणाचार्य यांनी केली.

नुकसानभरपाईसाठी अर्ज करा
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र बंददरम्यान दोन दिवसांत ज्यांच्या वाहनांचे नुकसान झाले ते राज्य सरकार भरून देईल, असे सांगितले होते. त्याच आधारावर बेस्ट उपक्रमाने जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसानभरपाई मिळण्यासाठीचा अर्ज करावा, असे निर्देश बेस्ट प्रशासनाला बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिले.

Web Title: mumbai news best loss by marathon