भिवंडी महापालिकेतर्फे ३२५ मालमत्तांचा लिलाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

भिवंडी - भिवंडी महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यासाठी शहरातील ३२५ थकबाकीदारांना दोन महिन्यांपूर्वी नोटिसा देऊनही त्याला प्रतिसाद न दिल्याने अखेर महापालिका प्रशासनाने या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार (ता. १८) ते सोमवारी (ता.२०) दरम्यान कायदेशीर बाजू तपासून ही कारवाई होईल, अशी माहिती आयुक्त डॉ. योगेश म्हसे, करमूल्यांकन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी पत्रकारांना दिली.

शहरात मोठ्या संख्येने कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयुक्त म्हसे यांच्या आदेशानुसार कर विभागाने आठ महिन्यांपूर्वी व्याज आणि दंडनीय कारवाई होऊ नये म्हणून थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करून सवलत दिली होती; परंतु त्याचा सकारात्मक परिणाम दिसून न आल्याने पुन्हा पालिकेने १४ ऑक्‍टोबर ते १७ नोव्हेंबरदरम्यान अभय योजना जाहीर केली होती. त्याचाही थकबाकीदारांवर परिणाम न झाल्याने आयुक्त म्हसे यांनी मालमत्ताधारकांना नोटीस बजावून जाहीर लिलावाची कारवाई करण्याचे लेखी संकेत दिले आहेत. लिलावाच्या कडक कारवाईअंतर्गत थकबाकीदारांच्या ३२५ मालमत्ता कर विभागातर्फे सील करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. प्रथम टप्प्यात बेकायदा इमारती आणि घरातील वीजपुरवठा आणि नळ कनेक्‍शन खंडित करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. थकबाकीदार मालमत्ताधारकांपैकी ज्यांनी मालमत्ताकराची अर्धीअधिक रक्कम भरली आहे, त्यांनी लिलावापासून वाचण्यासाठी उद्यापर्यंत (ता. १७) उरलेली रक्कम भरण्याची सवलत प्रशासनाने दिली आहे. 

या मालमत्तांचा होणार लिलाव
भिवंडी पालिकेत लिलाव होणाऱ्या मालमत्तेत प्रभाग क्रमांक एकमधील ३५, प्रभाग क्रमांक दोनमधील ११२, प्रभाग क्रमांक तीनमधील २०, प्रभाग क्रमांक चारमधील ६०, प्रभाग क्रमांक पाचमधील ९८ मालमत्तांचा समावेश आहे. हा लिलाव आयुक्त योगेश म्हसे, कर उपायुक्त वंदना गुळवेंसह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यालयात होणार आहे. मालमत्ताधारकांनी थकबाकी कर त्वरित भरून कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त म्हसे यांनी केले आहे.

Web Title: mumbai news Bhiwandi Municipal Corporation announces auction of 325 properties