जन्मदाखल्यात वडिलांच्या नावाबाबत भूमिका स्पष्ट करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

मुंबई - टेस्ट ट्यूबद्वारे बाळाला जन्म देणाऱ्या महिलेने वडिलांचे नाव जन्मदाखल्यावर न टाकण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मुंबई महापालिकेने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई - टेस्ट ट्यूबद्वारे बाळाला जन्म देणाऱ्या महिलेने वडिलांचे नाव जन्मदाखल्यावर न टाकण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मुंबई महापालिकेने याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

कुमारी माता असलेल्या आणि नालासोपारामध्ये राहणाऱ्या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. दोन वर्षांपूर्वी या महिलेने मुलीला जन्म दिला. तिच्या जन्मदाखल्यावर वडिलांचे नाव लिहिण्याची सक्ती महापालिकेकडून करण्यात आली; मात्र, हा रकाना रिकामा ठेवण्याची मागणी तिने केली होती. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही मागणी नामंजूर केल्याने तिने गतवर्षी उच्च न्यायालयात याचिका केली होती.

याबाबत पालिकेने खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने यापूर्वीच दिले आहेत; मात्र अद्याप पालिकेकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेले नाही. न्या. अभय ओक आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने बुधवारी (ता. 13) याचिकेवर सुनावणी करताना महापालिकेला नोटीस बजावली. भूमिका स्पष्ट करण्यासाठी पालिकेला अंतिम संधी आहे, असे बजावत न्यायालयाने दोन आठवड्यांसाठी सुनावणी तहकूब केली.

अन्य एका प्रकरणातही अविवाहित महिलेने बाळाच्या जन्मदाखल्यातून वडिलांचे नाव वगळण्याची मागणी करणारी याचिका केली आहे. पाच वर्षांपूर्वी महिलेने बाळाला जन्म दिला होता. त्या वेळेस तिने स्वतःहून वडिलांचे नाव जाहीर केले होते; मात्र नंतर तिने ते वगळण्याची मागणी केली.

नाव वगळण्यास हवे सबळ कारण
महापालिका सबळ कारणाशिवाय जन्म किंवा मृत्यू दाखल्यावरील नाव वगळू शकत नाही, असा खुलासा पालिकेच्या वतीने करण्यात आला. या प्रकरणात न्यायालयाने संबंधित वडिलांनाही पुढील सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले. नाव वगळण्यासाठी त्यांची संमती आहे का, याबाबत त्यांना खुलासा करावा लागणार आहे.

Web Title: mumbai news birth certificate father name