मुंबईत 2019 मध्ये भाजपचा महापौर? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबई - भांडुपमधील पोटनिवडणुकीतील विजयामुळे महापालिकेतील भाजपची संख्या एका सदस्याने वाढली असली तरी त्यांना शिवसेनेची बरोबरी करता येणार नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे किमान 10 नगरसेवक फोडण्याची कामगिरी भाजपमध्ये आलेल्या "सिंहा'वर सोपवण्यात आली आहे. 2019 मध्ये मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

मुंबई - भांडुपमधील पोटनिवडणुकीतील विजयामुळे महापालिकेतील भाजपची संख्या एका सदस्याने वाढली असली तरी त्यांना शिवसेनेची बरोबरी करता येणार नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे किमान 10 नगरसेवक फोडण्याची कामगिरी भाजपमध्ये आलेल्या "सिंहा'वर सोपवण्यात आली आहे. 2019 मध्ये मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

भांडुपमधील पोटनिवडणुकीमुळे भाजप नगरसेवकांची संख्या 82 झाली आहे. माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे भाजपची एक जागा रिक्त झाली आहे. गिरकर यांच्या प्रभागात सहा महिन्यांत पोटनिवडणूक घ्यावी लागणार असून त्यात भाजपचा विजय होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाजपची संख्या 83 वर पोहचेल. दोन अपक्षांसह भाजपची संख्या 85 होईल. मात्र, पालिकेत सत्तांतर घडवण्यासाठी ही संख्या अपुरी असल्याने कॉंग्रेसचे 10 नगरसेवक फोडण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. 

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांच्याबरोबर चार ते पाच नगरसेवक कॉंग्रेसमधून भाजपमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. मात्र, 11 नगरसेवक आल्यास पोटनिवडणूक घेण्याची गरज भासणार नसल्याने सहा ते सात नगरसेवक फोडण्याची जबाबदारी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या एका हिंदीभाषक नेत्यावर सोपवण्यात आली आहे. या नेत्याची मुंबई पालिकेत चांगली पकड असल्याने त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे समजते. 

2019 पूर्वी का नाही? 
ऑगस्ट 2019 मध्ये मुंबईत महापौरपदाची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी नगरसेवकांची फोडाफोडी करून स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट तसेच इतर समित्यांवर भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे शिवसेना दुखावण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील राजकारणावर होईल. यामुळे 2019 पर्यंत शिवसेनेला न दुखावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. 

चार भाजप नगरसेवकांची पदे धोक्‍यात 
भाजपमधील केसरबेन पटेल, मुरजी पटेल, सुधा सिंह आणि पंकज यादव यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे भाजपच्या या चार सदस्यांवरही टांगती तलवार आहे. या नगरसेवकांचे पद रद्द झाल्यास शिवसेनेच्या तीन जागा वाढण्याची शक्‍यता आहे.

Web Title: mumbai news BJP mayor 2019