कॉंग्रेसच्या आंदोलनाला भाजपचा अनोखा प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

दहिसर - नोटाबंदी, जीएसटी आणि जय शाह यांच्या कंपनीतील भ्रष्टाचाराविरोधात रविवारी (ता. 15) उत्तर मुंबईतील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या कार्यालयावर युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाची माहिती मिळताच भाजप नेत्यांनी कॉंग्रेस नेत्यांसाठी बॅनर, माईकची सोय करीत त्यांच्या आंदोलनातील हवाच काढून टाकली. त्यातच आंदोलनासाठी आलेल्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केल्याने पुढील राजकीय राडा टळला. 

नांदेड पालिकेत कॉंग्रेसला बहुमत मिळाल्याने कॉंग्रेसने आता भाजपविरोधात दंड थोपटणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून वाढती महागाई, नोटाबंदी, जीएसटी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाहने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मुंबईतील सर्व खासदारांच्या कार्यालय आणि घरांवर युवक कॉंग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांनी आंदोलनकर्त्यांसाठी माईकची सोय करून स्वागत करणारे बॅनर लावले. आंदोलनावेळी शेट्टी यांच्या कार्यालयावर भाजप आमदार मनीषा चौधरी, भाई गिरकर, जगदीश ओझा, विद्यार्थी सिंग आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शेट्टी स्वत: युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यकर्त्यासह उभे होते. परंतु पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील नाट्य टळले. 

आम्ही पारदर्शकता आणि लोकशाहीला मानणारे आहोत. त्यामुळे प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. अशी आंदोलने करूनच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे आंदोलनासाठी आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व जण उपस्थित होतो. त्यासाठी बॅनर आणि माईकची सोयही आमच्याकडून करण्यात आली होती, असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: mumbai news BJP response to the Congress agitation