'ब्ल्यू व्हेल'पाठोपाठ आता "ब्ल्यू नेट'चे संकट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

मुंबई - ऑनलाइन ब्ल्यू व्हेल गेम खेळणाऱ्या काही तरुण मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या असतानाच, आता ब्ल्यू नेट ऑनलाइन गेम खेळत असलेल्या मुंबईतील 15 वर्षांच्या मुलाने ऑनलाइन टास्क पूर्ण करण्यासाठी घर सोडल्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि दहशतवादविरोधी पथकानेही (एटीएस) मुलाचा शोध सुरू केला आहे.

जगभरात काही महिन्यांपासून ऑनलाइन ब्ल्यू व्हेल खेळणाऱ्या काही मुलांनी टास्क पूर्ण करण्यासाठी आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करला. आता ब्ल्यू व्हेलपाठोपाठ ब्ल्यू नेट गेमचे संकट समोर आले आहे. गोवंडी येथे आत्याबरोबर राहणारा 15 वर्षांचा दहावीतील मुलगा बेपत्ता झाला आहे. त्याचे वडील एका मीडिया कंपनीत संचालकपदावर कार्यरत आहेत. 29 ऑक्‍टोबर रोजी सर्व कुटुंबीय चित्रपट पाहण्यासाठी बाहेर गेले होते. त्या वेळी या मुलाने रात्री नऊच्या सुमारास 15 हजार रुपये घेऊन, घर सोडले. तो रात्री उशिरापर्यंत न परतल्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेतला. त्या वेळी त्यांना एक चिठ्ठी सापडली. त्यात मला शोधण्याचा प्रयत्न करू नका; मी परतणार नाही, असे लिहिले असल्याचे आढळले.

याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली. त्या वेळी तो ब्ल्यू नेट गेम खेळत असल्याचे उघड झाले. त्याने आतापर्यंत या गेमच्या दोन पातळ्या पूर्ण केल्या असून, तिसऱ्या पातळीसाठी घर सोडले असल्याची माहिती मित्रांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेऊन मुलाच्या ऑनलाइन हालचाली पडताळण्यास सुरवात केली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा, एटीएसनेही तपास सुरू केला; मात्र त्याचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.

ब्ल्यू नेटमध्ये 50 दिवस टास्क
ब्ल्यू नेट हा ब्ल्यू व्हेलप्रमाणेच गेम आहे. त्यात हा गेम खेळणाऱ्याला ऍडमिनकडून 50 दिवस विविध टास्क दिली जातात. यंदा जुलै महिन्यात अंधेरीत एका मुलाने आत्महत्या केल्यानंतर ब्ल्यू व्हेल खेळाबाबत खूपच चर्चा झाली होती. त्या वेळी त्याच्या मित्रांनी आत्महत्या केलेला मुलगा ब्ल्यू व्हेल खेळत असल्याचे सांगितले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात अशी कोणतीही बाब अद्याप पुढे आलेली नाही.

Web Title: mumbai news blue whale after blue net crisis