इमारत दुर्घटनेबाबतचा तपास रेंगाळल्याने न्यायालय संतप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मुंबई - चार वर्षांपूर्वी मुंब्रा येथील सातमजली "आदर्श' इमारत कोसळण्याच्या प्रकरणाचा तपास आणखी किती काळ कशा प्रकारे करणार आहात, अशी विचारणा शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली.

मुंबई - चार वर्षांपूर्वी मुंब्रा येथील सातमजली "आदर्श' इमारत कोसळण्याच्या प्रकरणाचा तपास आणखी किती काळ कशा प्रकारे करणार आहात, अशी विचारणा शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली.

शिळफाटा परिसरातील लकी कंपाउंडमधील ही इमारत एप्रिल 2013 मध्ये कोसळली होती. यामध्ये 74 रहिवाशांचा मृत्यू झाला होता. ठाणे पोलिसांनी आतापर्यंत 22 जणांवर आरोपपत्र दाखल केले असून, यात ठाणे महापालिकेतील तीन अधिकारी आहेत. ज्या कंत्राटदारांनी बांधकाम केले होते, त्यापैकी काही कंत्राटदार अजूनही मोकळेच आहेत, असा आरोप करणारी जनहित याचिका स्थानिक नागरिकांनी दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी न्यायाधीश आर. एम. सावंत आणि साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

पोलिस चार वर्षे उलटल्यानंतरही आता काय तपास करत आहेत, पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे, तर मग नवीन काय माहिती मिळाली आहे, की केवळ दाखवण्यासाठी तपासाचे कारण सांगितले जात आहे, अशा प्रश्‍नांची सरबत्ती खंडपीठाने केली. आतापर्यंत केलेल्या तपासाबाबत सविस्तर अहवाल दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले. यावर चार आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.

Web Title: mumbai news building colapse enquiry slow