मुंबई: भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली; 11 जणांचा मृत्यू

मंगेश सौंदाळकर
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

इमारतीच्या तळमजल्यात आग लागली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी घटनास्थळी भेट दिली. या इमारतीच्या बाजूच्या इमारतींनाही तडे गेले असून, खाली करण्यात आल्या आहेत. मृतांमध्ये सकिना चष्मावाला, नासिर अहमद, सईद, मुल्ला वाहीद, बुचाना, हुसैन आरतीवाला, तस्नीम आरतीवाला यांचा समावेश आहे.​

मुंबई : मुंबईतील भेंडीबाजार परिसरातील जेजे मार्गावरील हुसैनीवाला ही 125 वर्षे जुनी तीन मजली रहिवाशी इमारत आज (गुरुवार) सकाळी कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 11 जणांचा मृत्यू झाला. तर, 14 जण जखमी असून, त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत दहा जणांना सुखरूप बाहेर काढले असून, या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही रहिवाशी इमारत कोसळली. भेंडीबाजारमधील जेजे रोडवरील ही इमारत आहे. ही इमारात 125 वर्षे जुनी आहे. या इमारतील 9 कुटुंबे राहत होती. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य युद्ध पातळीवर करण्यात आले. महापालिका प्रशासनातील अधिकारीही याठिकाणी पोचले आहेत. इमारत पडण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात 5 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. जखमीमध्ये 2 अग्निशमन दलाच्या जवानांचाही समावेश आहे. आतापर्यंत 21 लोकांना वाचविण्यात अग्निशमन दलाला तसेच एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे, मदतकार्य सुरु असून, अजून काहीजण ढिगारयाखाली असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये 6 महिन्यांची गरोदर माता आहे. 

इमारतीच्या तळमजल्यात आग लागली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी घटनास्थळी भेट दिली. या इमारतीच्या बाजूच्या इमारतींनाही तडे गेले असून, खाली करण्यात आल्या आहेत. मृतांमध्ये सकिना चष्मावाला, नासिर अहमद, सईद, मुल्ला वाहीद, बुचाना, हुसैन आरतीवाला, तस्नीम आरतीवाला यांचा समावेश आहे.

मुंबईत गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. घाटकोपर परिसरात नुकतीच इमारत कोसळली होती. यामध्ये अनेक जणांना जीव गमवावा लागला होता. मुंबईला मंगळवारी मुसळधार पावसाने तडाखा दिला होता. त्यामुळेच ही जुनी इमारत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Mumbai news building collapse in mumbai 11 dead