छोटा शकीलकडून व्यावसायिकाला धमकी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

मुंबई - गुन्हेगारी टोळ्यांनी आता पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. आंतरराष्ट्रीय गुंड दाऊद इब्राहिम याचा हस्तक छोटा शकीलच्या नावाने एका व्यापाऱ्याला दहा कोटींची खंडणी मागणारा दूरध्वनी आल्याने खळबळ उडाली आहे. जुहू पोलिसांनी फहीम नावाच्या व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा दूरध्वनी स्पेनहून आला असल्याचे समजते.

जुहूमधील जेव्हीपीडी येथील इमारतीत हा व्यावसायिक राहतो. 27 जुलैला सायंकाळी त्याच्या कार्यालयात फहीम नावाच्या व्यक्तीचा दूरध्वनी आला होता. आपण छोटा शकीलच्या वतीने बोलत असून, व्यवसाय चांगला सुरू आहे ना, असे त्याने विचारले. मात्र त्याकडे व्यावसायिकाने दुर्लक्ष केले. त्याने 2 ऑगस्टपर्यंत खंडणीसाठी वारंवार दूरध्वनी केले आणि दहा कोटींची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास परिणाम वाईट होईल, असेही धमकावले. व्यावसायिकाने 2 ऑगस्टला जुहू पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. 3444 पासून सुरू होणारा हा दूरध्वनी स्पेनमधून आल्याचा संशय असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याची गंभीर दखल घेण्यात आली असून, स्थानिक पोलिस, गुन्हे शाखेचे पोलिस आणि खंडणीविरोधी पथकाचे पोलिस तपास करत आहेत. अशा प्रकारे अन्य काही व्यावसायिकांनाही धमकावण्यात आल्याचे समजले आहे.

दूरध्वनी करणारा फहीम मचमच?
दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव फहीम असल्याचे सांगितले. हा फहीम म्हणजे दाऊदचा जवळचा साथीदार फहीम मचमच तर नाही ना, असा प्रश्‍न सुरक्षा यंत्रणांना पडला आहे.

Web Title: mumbai news businessman warning by chota shakil