भायखळा तुरुंगातील सत्य "सीसीटीव्ही'तून उलगडणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

मुंबई - भायखळा तुरुंगातील मंजुळा शेट्ये या महिला कैद्याचा आणि त्यानंतर झालेल्या कैद्यांच्या आंदोलनाविषयी अनेक आरोप-प्रत्यारोप होत असले तरी, या घटनेमागील सत्यस्थिती लवकरच उघड होणार आहे. कारण महिला कैद्यांनी जाळपोळ केलेल्या "सीसीटीव्ही'ची "हार्ड डिस्क' व नेटवर्क व्हिडीओ रेकॉर्डर (एनव्हीओ) यातून चित्रीकरण मिळवणे शक्‍य असल्याचे प्राथमिक तपासणीत दिसून आले आहे. सायबरतज्ज्ञ याविषयी काम करत असून, आठवडाभरात संपूर्ण "डेटा' मिळवला जाईल, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

मंजुळा शेट्येच्या मृत्यूनंतर महिला कैद्यांनी 24 जून रोजी जाळपोळ व दगडफेक केली होती. या आंदोलनाचा फायदा घेत काही कैदी महिलांनी तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. पळ काढणाऱ्या महिलांनी सीसीटीव्ही कॅमेरे तोडत कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंगची होळी केली. त्यात चित्रीकरण साठवणाऱ्या दोन "हार्ड डिस्क' व "एनव्हीआर' संचाचेही नुकसान झाले होते. नागपाडा पोलिसांनी "हार्ड डिस्क' व "एनव्हीआर' हे "डेटा' मिळवण्यासाठी न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठवले होते. प्राथमिक पाहणीत त्यातील "डेटा' मिळवणे शक्‍य असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

"हार्ड डिस्क' व "एनव्हीआर'ची स्थिती पाहता त्यातून "डेटा' मिळवणे शक्‍य वाटत आहे. शनिवारपासून (ता. 1) त्यावर काम करण्यास सुरवात करण्यात येईल. विशेष सॉफ्टवेअरच्या साह्याने त्यातील चित्रीकरण मिळवण्यात येईल. संबंधित चित्रीकरण व अहवाल आठवडाभरात पोलिसांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आठवडाभरातच नेमके चित्र स्पष्ट होईल. 

Web Title: mumbai news Byculla jail