मुंबई - मुंबई महापालिकेच्या मागील 10 वर्षांच्या कामांची कॅगमार्फत चौकशी करा, म्हणजे खरा डल्लामार कोण आहे, हे जनतेसमोर येईल, असा पलटवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे सत्ताधारी भाजप व शिवसेनेने धसका घेतला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या समारोप सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पैठण येथील सभेत हल्लाबोल यात्रेला "डल्लामार' असे संबोधून टीका केली होती. ठाकरे यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना मुंडे म्हणाले की, मुंबई मनपात रस्ते, नाले, टॅब, आरोग्य सुविधा या सर्वंच सेवांमध्ये शिवसेनेने डल्ला मारलेला आहे. त्यामुळे शिवसेनेने डल्ल्याची भाषा करू नये. रायगड येथे मुख्यमंत्र्यांची टीका असो किंवा उद्धव ठाकरेंनी केलेली टीका दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाचा प्रचंड धसका घेतल्याचे मुंडे यांनी सांगितले. मुंबई पालिकेतील मागील 10 वर्षांच्या कामांची कॅगमार्फत चौकशी करा; म्हणजे रस्त्यांपासून, खड्ड्यांपर्यंत आणि नाल्यापासून कचऱ्यापर्यंत कोणी डल्ला मारला हे समजेल, असे ट्विट मुंडे यांनी केले आहे.
|