खटले मागे घेण्यासाठी दलित नेत्यांनी एक व्हावे - डॉ. राजेंद्र गवई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मुंबई - कोरेगाव भीमा येथील दलितांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधासाठी पुकारलेल्या "महाराष्ट्र बंद'दरम्यान निरपराध कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खटले मागे घेतले जावेत, यासाठी ऍड. प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांनी एकत्र यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी गुरुवारी (ता. 15) येथे पत्रकार परिषदेत केली. आपण लवकरच या दोन्ही नेत्यांना भेटणार आहोत, असेही ते म्हणाले.

कोरेगाव भीमाप्रकरणी हल्ल्याचा निषेध करणाऱ्या राज्यभरातील सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा आरोप डॉ. गवई यांनी केला. कार्यकर्त्यांवरील खटले अद्याप मागे घेण्यात आले नाहीत. सोशल मीडियावरही त्याबाबत चर्चा होते; मात्र कार्यकर्त्यांना मदत होत नाही. त्यामुळे आंबेडकर आणि आठवले यांनी कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी त्यांनी एकत्र यावे. त्यांच्यासह इतर गटांच्या नेत्यांनीही एकत्र यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

कोरेगाव भीमामधील हल्ल्याचे सूत्रधार मिलिंद एकबोटे यांना सर्वोच्च न्यायालयात अंतरिम जामीन मिळाला; मात्र त्यांना कायमस्वरूपी जामीन मिळू नये, यासाठी चांगला सरकारी वकील नेमण्याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार, असेही डॉ. गवई यांनी सांगितले.

Web Title: mumbai news case dalit leader dr rajendra gawai