एप्रिलपासून शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य विमा?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मुंबई - राज्यातील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्यासाठी माहिती जमा करण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू केले आहे. ही योजना एक एप्रिलपासून कार्यान्वित करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. त्या दृष्टीने प्राथमिक कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी संबंधितांना दिले आहेत.

या योजनेसाठी आरोग्य विभागाने के. एम. दस्तूर रिइन्शुरन्स या विमा संस्थेबरोबर करार केला आहे. या योजनेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांची माहिती द्यावी, असे आवाहन शिक्षण आयुक्तांनी केले आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने गुगल ड्राईव्हवर लिंकही उपलब्ध करून दिली आहे. 31 मार्चपूर्वी लिंकवरील ऍप्लिकेशनवर ही माहिती भरण्याची सूचना करण्यात आली आहे.

या योजनेसाठी मुंबई मुख्याध्यापक संघटनेने सरकारकडे पाठपुरावा केला होता. शिक्षण विभागाच्या निर्णयाचे या संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी स्वागत केले आहे; मात्र या योजनेसाठीचा करार सरकारी विमा कंपनीशी केला जाईल, अशी अपेक्षा होती, असे ते म्हणाले.

Web Title: mumbai news cashless health insurance for teacher