'सीसी टीव्हीच्या कक्षा रुंदावणार'

'सीसी टीव्हीच्या कक्षा रुंदावणार'

नवी मुंबई - वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नवी मुंबई शहरात लावण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या संख्येत लवकरच भर पडणार आहे. तब्बल एक हजार ५०० कॅमेरे लावण्यास राज्याच्या गृह विभागाने हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गृह खात्याच्या परवानगीमुळे नवी मुंबईतील दुर्लक्षित परिसर आता तिसऱ्या डोळ्याच्या दृष्टिक्षेपात येणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सुमारे १५ कोटी खर्च करून शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी २८४ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. परंतु ते मोक्‍याची ठिकाणे वगळता इतर ठिकाणी नसल्याने बाजारपेठा, अंतर्गत चौक, उद्याने, महत्त्वाच्या शाळेबाहेरील रस्ते, खाडीकिनारे, बस आगार, पेट्रोल पम्प अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे नसल्याने गुन्हेगारांचे फावते. सीसी टीव्हीअभावी शहरात रस्त्यावरून वर्दळीच्या ठिकाणी महिला व ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. या वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी गृह विभागामार्फत निधी उपलब्ध करून नवी मुंबई शहरात तब्बल एक हजार ५०० सीसी टीव्ही बसवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या प्रस्तावांतर्गत महापालिकेने अहवाल तयार करून अंतिम अभिप्रायासाठी नवी मुंबई पोलिसांकडे पाठवला आहे. महापालिकेने दिलेल्या अहवालाचा अभ्यास करून पोलिसांना अंतिम अहवाल देणे अभिप्रेत होते. परंतु, यात दिरंगाई होत असल्याने अखेर आमदार म्हात्रे यांनी पाठपुरावा करून गृह विभागाकडून नवी मुंबई शहरात सुमारे १,५०० सीसी टीव्ही बसवण्यास परवानगी मिळवली. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. 

किनारे होणार सुरक्षित 
राज्य सरकारच्या मान्यतेनंतर नवी मुंबईतील सागरी किनारे, वर्दळ नसणारे रस्ते, उद्याने, ज्येष्ठ नागरिकांची संकुले, विरंगुळा केंद्रे, मैदाने, गावठाण आदी परिसर सीसी टीव्हीच्या कक्षेत येणार आहे. याकरिता लागणारा निधी राज्य सरकार, सिडको प्रशासन व काही निधी महापालिकेच्या तिजोरीतून खर्च करण्यात येणार आहे. सीसी टीव्ही बसवल्यानंतर त्याच्या देखभालीचे काम महापालिकेला करावे लागणार आहे. परंतु या सीसी टीव्हींचे नियंत्रण केंद्र नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात असेल. 

अतिरिक्त सीसी टीव्हींमुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसून नवी मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेत भर पडणार आहे. सोनसाखळी खेचणे, दरोडा यांसारख्या घटनांवर अंकुश बसण्यास मदत होईल आणि रोडरोमिओंकडून दिल्या जाणाऱ्या त्रासातून महिलांची सुटका होईल.     
- मंदा म्हात्रे, आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com