झाकीर नाईकविरोधात आरोपपत्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

मुंबई - वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईक याच्याविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मनी लॉण्डरिंग आणि दहशतवाद पसरवण्यासाठी पैसा पुरवल्याप्रकरणी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या 65 पानांच्या आरोपपत्रात प्रक्षोभक भाषणे आणि दहशतवादाला खतपाणी घातल्याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले आहेत. सुमारे एक हजार पानांचे दस्तावेज आणि 80 हून अधिक साक्षीदारांचे कबुलीजबाब या आरोपपत्राला जोडले आहेत.

झाकीर नाईक सध्या परदेशात असून, "एनआयए'ने त्याच्यावर काळा पैसा जमवणे व दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवणे असे आरोप ठेवले आहेत. दरम्यान, फरारी घोषित केलेल्या संशयित आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास त्याच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे.

बांगलादेशात गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांनी झाकीर नाईकपासून प्रेरणा घेतल्याचे कबूल केल्यानंतर झाकीर भारतातून पळून गेला होता. जुलै 2016 मध्ये भारतातून पळ काढल्यानंतर एनआयएने नोव्हेंबरमध्ये त्याच्यावर मुंबईत गुन्हा दाखल केला होता.

मुंबईत इस्लामिक रिसर्च फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था असून, ती बेकायदा असल्याचे गृह मंत्रालयाने जाहीर केले आहे. झाकीर याला सौदी अरेबियाने नागरिकत्व दिले असल्याचे बोलले जात असले, तरी याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. झाकीरच्या संस्था आणि त्याच्या संशयास्पद व्यवहारांचा एनआयए सध्या तपास करत आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी अटक केलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकर याने पोलिसांच्या चौकशीत दाऊद इब्राहिम आणि वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक झाकीर याचे संबंध असल्याचा खुलासा केला होता.

2012 पासून दाऊद इब्राहिम हा झाकीरला पैसे पुरवत असल्याचा खळबळजनक खुलासा इक्‍बाल कासकरने केला होता. मुंबईतील काही उद्योगपती दाऊदच्या सांगण्यावरून झाकीरला मदत करतात आणि त्याला पैसा पुरवतात, असे इक्‍बालने सांगितले आहे. झाकीरच्या कथित "एनजीओ'द्वारे हवाला नेटवर्कलाही पैसा पुरवला जातो, असेही इक्‍बालने पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार एनआयए तपास करत आहे.

अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
वादग्रस्त धर्मप्रसारक असलेला झाकीर व्यवसायाने डॉक्‍टर आहे. इस्लामिक रिसर्च फाउंडेशन व पीस टीव्ही या संस्थांविरोधात धार्मिक विद्वेष पसरवल्याचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. त्याच्या या संस्थेवर बंदी घालण्यात आली असून, पीस टीव्हीचे प्रक्षेपण बंद करण्यात आले आहे. त्याचा पासपोर्टही रद्द केलेला आहे. चौकशीसाठी झाकीरला नोटीसही देण्यात आली होती; पण तो उपस्थित झाला नाही. एप्रिल 2017 मध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.

Web Title: mumbai news charge sheet on jhakir naik