मोहरमच्या जुलूसमध्ये लहानग्यांचा सहभाग नको

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

मुंबई - मोहरमनिमित्त काढण्यात येणाऱ्या मातमच्या जुलूसमध्ये लहान मुलांचा सहभाग नसावा, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. यासंदर्भात शियापंथी मुस्लिम आयोजकांनीच सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही खंडपीठाने सुचवले. दक्षिण मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी याबाबत आयोजकांशी चर्चा करून तोडगा काढावा, असे आदेशही खंडपीठाने दिले.

मोहरमच्या मातम जुलूसमध्ये आबालवृद्ध मुस्लिम शरीरावर धारधार शस्त्रांनी घाव करून घेतात. यात लहान मुलांचाही सहभाग असतो. मुस्लिम धर्माचे प्रेषित महंमद पैंगबर यांचे वारसदार इमाम हुसैन यांचा शहीद दिवस म्हणून मातम जुलूस काढला जात असला तरी, यातील मुलांचा सहभाग त्यांच्या जिवावर बेतू शकतो, असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. न्या. आर. एम. सावंत आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. दक्षिण मुंबईत मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत.

मोहरमनिमित्त दरवर्षी भेंडी बझार ते भायखळापर्यंत मुंबईतील सर्वांत मोठा जुलूस निघतो. यंदा सप्टेंबरमध्ये मोहरम आहे. यानिमित्त निघणाऱ्या जुलूसमध्ये लहान मुले सहभागी होणार नाहीत, यासाठी दक्षिण मुंबईतील अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी मिरवणूक आयोजकांशी चर्चा करून तोडगा काढावा, असे निर्देश खंडपीठाने दिले. अल्पवयीन मुलांनी तरी यात सहभागी होऊ नये, अशी अपेक्षा खंडपीठाने व्यक्त करत तीन आठवड्यांकरिता सुनावणी तहकूब केली.

Web Title: mumbai news child not involve in moharam rally