बालचित्रवाणी होणार इतिहासजमा !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

निधी नसल्याने बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय

निधी नसल्याने बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय
मुंबई - रेडिओ, दूरदर्शनच्या माध्यमातून शालेय शिक्षणाचे धडे देऊन शिक्षणाचे महत्त्व वेळोवेळी विशद करणाऱ्या व समाजात शिक्षणासाठी जनजागृती करणाऱ्या राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था अर्थात बालचित्रवाणी या संस्थेला अखेर टाळे लागणार असून, ती कायमची आता इतिहासजमा होणार आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने आज एक शासन निर्णयाद्वारे ही संस्था बंद करत असल्याचे जाहीर केले आहे. बालचित्रवाणी बंद करून त्यासोबतच अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बालभारतीचेही ई-बालभारतीत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

तीन दशकांहून अधिक काळ शिक्षणाच्या क्षेत्रात आपला कायम वेगळा ठसा उमटविणाऱ्या बालचित्रवाणीला चालविण्यासाठी सरकारकडे निधी नसल्याचे कारण सांगून ती बंद केली जाणार आहे. राज्यातील शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात बालभारतीसोबतच बालचित्रवाणी या स्वायत्त संस्थेचे मोठे योगदान राहिलेले आहे. इन्सॅट उपग्रहाद्वारे बालचित्रवाणीचे कार्यक्रम राज्यातील गावागावांमध्ये पोचविले जात होते. 27 जानेवारी 1984 रोजी बालचित्रवाणीची स्थापना झाली होती. या संस्थेकडून सुमारे 6000 हून अधिक शैक्षणिक दृकश्राव्य साहित्याची निर्मिती करण्यात आली होती. ऑगस्ट 2012 पासून दूरदर्शनवर बालचित्रवाणीच्या कार्यक्रमाला शुल्क आकारणी केली जात असताना त्यासाठीचे अनुदान केंद्राकडून आले नाही. यामुळे फेब्रुवारी 2014 पासून दूरदर्शनवर बालचित्रवाणीचे कार्यक्रम बंद करण्यात आले होते.

यादरम्यान, राज्य सरकारने बालचित्रवाणीचे प्रक्षेपण सुरू राहावे, यासाठी कोणीतीही उपाययोजना केली नसल्याने बालचित्रवाणीला जीवदान मिळू शकले नाही. बालचित्रवाणी वाचविण्याची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असताना त्यांनी ती पार पाडली नसल्याने बंद करण्याचा निर्णय घेतला असून, राज्याच्या शैक्षणिक हितासाठी मारक असल्याच्या प्रतिक्रिया शैक्षणिक क्षेत्रात उमटल्या आहेत, तर बालभारतीचे ई-बालभारती करण्यावरही उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Web Title: mumbai news Childhood will be history!