'सिटी टॅक्‍सी' परवान्यांचेही आता अमर्याद पीक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

नव्या नियमामुळे टुरिस्ट टॅक्‍सीचीही शहरसेवा
मुंबई - एकीकडे काळी-पिवळी टॅक्‍सी आणि रिक्षा यांच्या संख्येवर निर्बंध असताना नव्या सिटी टॅक्‍सी नियमानुसार ऍप व वेब बेस टॅक्‍सींसाठी अमर्याद परवाने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार टुरिस्ट टॅक्‍सी परवाना बदलून शहरात त्यांचा वापर "सिटी टॅक्‍सी' म्हणून करता येईल.

नव्या नियमामुळे टुरिस्ट टॅक्‍सीचीही शहरसेवा
मुंबई - एकीकडे काळी-पिवळी टॅक्‍सी आणि रिक्षा यांच्या संख्येवर निर्बंध असताना नव्या सिटी टॅक्‍सी नियमानुसार ऍप व वेब बेस टॅक्‍सींसाठी अमर्याद परवाने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार टुरिस्ट टॅक्‍सी परवाना बदलून शहरात त्यांचा वापर "सिटी टॅक्‍सी' म्हणून करता येईल.

टुरिस्ट टॅक्‍सी ही देशभर फिरू शकते, मात्र त्यांना शहरात व्यवसाय करता येत नाही. स्टॅंडच्या मर्यादित जागेमुळे काळी-पिवळी टॅक्‍सीच्या संख्येवर निर्बंध आहेत. मात्र ऍपवर आधारित टॅक्‍सींना स्टॅंडची गरज नसल्याने त्यांच्या संख्येवर निर्बंध नाहीत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासासाठी (ऍप व वेब बेस) टॅक्‍सी सेवांचे नियमन करण्याचे परिवहन विभागाने ठरवले आहे. त्यासाठी महाराष्ट्र सिटी टॅक्‍सी नियम 2017 लागू करण्यात आला. त्यानुसार सिटी टॅक्‍सी परवाने अमर्याद देण्यात येतील. सिटी टॅक्‍सी परवाने देण्याचा आकडा परिवहन विभागाने निश्‍चित केलेला नाही. मागणी व पुरवठ्यानुसार परवाने दिले जातील, असे परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या परवान्यांसाठी ऑनलाइन फॉर्म भरता येतील.

राज्य सरकारने 4 मार्च 2017 रोजी अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र सिटी टॅक्‍सी नियम 2017ला मान्यता दिली. त्यामुळे 20 मेपासून संपूर्ण राज्यासाठी नियम लागू करण्यात आला. सिटी टॅक्‍सी परवाना मिळवण्यासाठी महाऑनलाइनच्या सहकार्याने ऑनलाइन फॉर्म भरता येतील. सिटी टॅक्‍सी परमिट महाऑनलाइन तसेच परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरही हे अर्ज आहेत. घरातील संगणकावरून अथवा सीएसएसी/संग्राम केंद्रामार्फत अर्ज करता येतील. त्यासाठी 20 रुपये अधिक कर ऑनलाइन भरावा लागेल. अर्जही ऑनलाइन मंजूर केले जातील. अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्जदार इरादापत्राची प्रत प्रिंट करू शकतो. 980 ते 1,400 सीसी इंजिन क्षमतेच्या वाहनांसाठी 25 हजार रुपये शुल्क, तर त्यापेक्षा अधिक सीसी असणाऱ्या वाहनांसाठी दोन लाख 61 हजार परवाना शुल्क ई पेमेन्टद्वारे भरणे आवश्‍यक आहे.
राज्यात 50 हजार टुरिस्ट टॅक्‍सी आहेत. या टॅक्‍सींसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची मुदत 3 जूनपर्यंत असली, तरी या नंतरही अर्ज स्वीकारण्यात येतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: mumbai news city taxi permit