कंत्राटी कामगारांची पालिकेवर धडक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी कंत्राटी कामगारांना न्याय देण्याचा शब्द दिला आहे. तो त्यांनी न पाळल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. 
- ॲड्‌. सुरेश ठाकूर, कामगार नेते

तुर्भे - नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांनी शुक्रवारी (ता. १५) नवी मुंबई म्युन्सिपल मजदूर युनियनच्या झेंड्याखाली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.    
मोर्चाचे नेतृत्व ॲड. सुरेश ठाकूर यांनी केले. कामगारांना न्याय द्या, अशी घोषणाबाजी करत शेकडो कामगारांनी मुख्यालयाबाहेर घंटानाद केला. कंत्राटी कामगारांना कायम करा, समान काम समान वेतन तत्त्वाची अंमलबजावणी करा, वेतन श्रेणीतील तफावत दूर करा, महागाई भत्त्याचा फरक द्या, गणवेश आणि स्वच्छता साहित्य द्या आदी मागण्या कामगारांनी केल्या. 

कंत्राटी कामगारांसाठी सामूहिक विमा योजना आणि घरकुल योजना राबवण्याची, किमान वेतनाच्या थकबाकीची आणि भविष्यनिर्वाह निधी व ग्रज्युईटी देण्याच्या मागण्याही कामगारांनी केल्या. कंत्राटी कामगारांना सामूहिक विमा योजना लागू करण्याची मागणीही युनियनने पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

कंत्राटी कामगार हा महापालिकेचा कणा आहे. त्याला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार युनियनचे नेते ॲड. ठाकूर यांनी या वेळी केला. ॲड. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांनी दिले. तसेच अन्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल आणि लवकरात लवकर आयुक्त एन. रामास्वामी यांच्याबरोबर बैठक घेतली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी मोर्चेकऱ्यांना दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: mumbai news Contract workers