'त्या' नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाला मान्यता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मुंबई - मनसेतून फुटून शिवसेनेत प्रवेश केलेल्या त्या सहा नगरसेवकांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर येत्या 15 फेब्रुवारीला त्यांना तब्बल चार महिन्यांनंतर पालिकेच्या सभागृहात बसता येणार आहे. स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीतही आता या नगरसेवकांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्यामुळे शिवसेनेचे सभागृह आणि विविध समित्यांमधील संख्याबळ वाढणार आहे.

कोकण विभागीय आयुक्तांनी शिवसेनेच्या 93 नगरसेवकांच्या गटाला मान्यता दिली. तसे पत्र पालिका आयुक्तांना पाठवल्याने पालिका सभागृहात महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी तशी घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ आता 87 वरून आता 94 झाले आहे.

गेल्या वर्षी मनसेच्या सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करून मनसेसह भाजपलाही धक्का दिला होता; मात्र वेगळा गट स्थापन करून शिवसेनेत अधिकृत प्रवेशासाठी कोकण विभागीय आयुक्तांची मान्यता मिळणे आवश्‍यक होते. याच वेळी मनसेने आयुक्तांकडे तक्रार करून या सहा नगरसेवकांच्या गटाला मान्यता न देता त्यांचे पद रद्द करा, त्यांना कोणत्याही समित्यांच्या बैठकांना बसू देऊ नये, अशी तक्रार केली होती. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश गेल्या चार महिन्यांपासून रखडला होता.

Web Title: mumbai news corporator shivsena mns politics