मुलीने केलेल्या स्वेच्छा निकाहास न्यायालयाची मान्यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

मुंबई - आई-वडिलांच्या मर्जीविरोधात जाऊन केलेला निकाह मुंबई उच्च न्यायालयाने मान्य करून मुलीच्या पतीविरुद्ध केलेली तक्रारही रद्द केली आहे.

मुंबई - आई-वडिलांच्या मर्जीविरोधात जाऊन केलेला निकाह मुंबई उच्च न्यायालयाने मान्य करून मुलीच्या पतीविरुद्ध केलेली तक्रारही रद्द केली आहे.

नागपूरमध्ये राहणाऱ्या उच्च शिक्षित तरुणीने केलेल्या निकाहामुळे तिचे आई-वडील नाराज होते. त्यांनी मुलीचा पती आणि तिच्या सासऱ्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. ही तक्रार रद्दबातल करण्यासाठी मुलाने याचिका दाखल केली होती. त्या याचिकेमध्ये मुलीने स्वेच्छेने माझ्याशी निकाह केला आहे. मी किंवा माझे घरचे तिची कोणत्याही प्रकारची छळणूक करीत नाहीत, असे म्हटले होते. त्यावर याबाबत सरकारी वकिलांनी मुलीचा जबाब नोंदवावा, असे निर्देश न्या. वासंती नाईक आणि न्या. एम. जी. गिरटकर यांच्या खंडपीठाने दिले. मात्र मुलगी निकाहानंतर पतीसह मुंबईत आहे. त्यामुळे तिचा जबाब व्हॉट्‌सऍप व्हिडिओ कॉलने घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

त्यानुसार सरकारी वकिलांनी मुलीला व्हॉट्‌सऍप व्हिडिओ कॉल केला आणि तिचा जबाब नोंदवला. "माझा पती पोलिस दलात भरती झाल्याने मी त्याच्यासह मुंबईला आले आहे. मी माझ्या मर्जीने आले आहे आणि त्याच्यासोबत सुखी आहे', असे मुलीने सरकारी वकिलांना सांगितले.

तसेच पुन्हा नागपूरला माहेरी जाण्याची इच्छा नसल्याचेही तिने स्पष्ट केले. न्यायालयाने हा जबाब नोंदवून घेतला आणि मुलासह अन्य सासरच्या मंडळींविरोधात दाखल केलेले गुन्हे रद्दबातल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

Web Title: mumbai news court permission to girl self nikah