मुलीचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

मुंबई - पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून 10 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना पकडण्यात गुन्हे शाखेला सोमवारी यश आले. आरोपींना ट्रॉम्बे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कर्ज फेडण्यासाठी मुलीचे अपहरण करून खंडणीची मागणी केल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले.

मुंबई - पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून 10 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना पकडण्यात गुन्हे शाखेला सोमवारी यश आले. आरोपींना ट्रॉम्बे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कर्ज फेडण्यासाठी मुलीचे अपहरण करून खंडणीची मागणी केल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले.

ट्रॉम्बेतील चित्ता कॅम्प परिसरात राहणारे मोहंमद इक्‍लाख शेख यांचा धारावी परिसरात कपडे तयार करण्याचा व्यवसाय आहे. शनिवारी (ता. 27) सकाळी त्यांची पाच वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. परिसरात शोध घेऊनही ती सापडली नाही, म्हणून कुटुंबीयांनी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, अपहरणकर्त्याने मुलीच्या वडिलांना फोन करून दहा लाखांची खंडणी मागितली. मुलीच्या वडिलांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर आरोपीचा शोध सुरू झाला; मात्र शनिवारीच अपहरण झालेली मुलगी धारावी परिसरात सापडली होती.

आरोपी वापरत असलेले सीम कार्ड शिवाजीनगर परिसरातून खरेदी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी प्रथम इम्रान शेख (वय 24) याला पकडले. त्यानंतर त्याला मदत करणाऱ्या मोहंमद अब्बास खान (34) याच्या मुसक्‍या आवळल्या.

असा सापडला मुख्य आरोपी
या प्रकरणातील मुख्य आरोपी इम्रान हा तक्रारदाराच्या मावशीचा मुलगा आहे. तो शेख यांच्या कारखान्यातील बॅग बाहेर विकायचा. त्या वेळी कारखान्यातील सगळी उलाढाल पाहून इम्रानने हा कट रचला होता. संशयित म्हणून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आधी इम्रानच्या भावाला ताब्यात घेतले. त्यामुळे घाबरून इम्रानने अपहृत मुलीला धारावी येथे सोडून पोबारा केला. तेव्हापासून त्याचा मोबाईल बंद होता. त्याचवेळी गुन्हे शाखेच्या पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिकच बळावला होता.

Web Title: mumbai news crime